Kolkata Rape Case: कोलकात्यामधील आर. जी. कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील 31 वर्षीय प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आल्याचं उघड झाल्यानंतर पश्चिम बंगालमधील डॉक्टर मागील 10 दिवसांपासून आंदोलन करत आहेत. आंदोलन करणाऱ्या या डॉक्टरांवर मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेस पक्षाचे खासदार अरुप चक्रबर्ती यांनी एक वादग्रस्त विधान केलं आहे. "डॉक्टरांनी सुरु केलेल्या संपामुळे जन आक्रोश उसळला तर आम्ही तुम्हाला वाचवू शकत नाही," असं म्हटलं आहे. या विधानाच्या माध्यमातून या नेत्याने आधीच धुमसत असलेल्या आंदोलनाच्या आगीत तेल ओतण्याचं काम केल्याची टीका आता केली जात आहे.
"आंदोलनाच्या नावाखाली तुम्ही घरी जाऊ शकता किंवा तुमच्या प्रियकराबरोबर जाऊ शकता. मात्र तुमच्या या आंदोलनामुळे रुग्ण दगावला आणि लोकांनी संतापून तुमच्यावर हल्ला केला तर आम्ही तुम्हाला वाचवू शकत नाही," असं चक्रबर्ती यांनी पश्चिम बंगालमध्ये रविवारी एका सभेमधील भाषणात म्हटलं.
मंचावरुन खाली उतरल्यानंतर पत्रकारांनी चक्रबर्ती यांना त्यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाबद्दल सवाल केला. त्यावेळेस त्यांनी आपण आपल्या विधानावर ठाम असल्याचं सांगितलं. "डॉक्टरांचा संप सुरु आहे. संपाच्या नावाखाली ते बाहेर गेले आणि लोकांना इलाज मिळाला नाही तर नैसर्गिकपणे त्यांच्यावर लोक संताप व्यक्त करतील. त्यावेळी आम्हीही त्यांना वाचवू शकणार नाही," असं चक्रबर्ती यांनी आपली भूमिका अधोरेखित करताना म्हटलं.
14 ऑगस्टनंतर रोजी जमावाने आर. जी. कर हॉस्पीटलमध्ये घुसून डॉक्टरांवर हल्ला केला होता. या हल्लेखोरांनी काही आंदोलकांबरोबरच पोलिसांवरही हल्ला केलेला. त्यांनी आंदोलन सुरु असलेल्या ठिकाणी गोंधळ घातला. आपत्कालीन उपचारांसाठीच्या राखीव इमारतीच्या तळ मजल्यावर त्यांनी नासधूस केली.
तृणमूल काँग्रेसच्या काही नेत्यांनी आंदोलनकर्त्या डॉक्टरांना समर्थन दिलं आहे. या नेत्यांनी कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. मात्र तृणमूलच्या अनेक नेत्यांनी ममता बॅनर्जी सरकारची पाठराखण केली आहे.
ममता बॅनर्जींच्या पक्षाचे नेते उदयन गुहा यांनी बलात्कार आणि हत्या प्रकरणी मुख्यमंत्र्यांना दोष देणाऱ्यांची तसेच त्यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्यांची बोटे तोडली जातील असं विधान केलं. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर गुहा यांच्यावर टीका केली जात आहे. "जे ममता बॅनर्जींवर टीका करत आहेत. त्यांच्याकडे बोट दाखवत आहेत तसेच त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत त्यांना सांगू इच्छितो की त्यांची इच्छा कधीही पूर्ण होणार नाही. ममता बॅनर्जींकडे बोट दाखवण्यांची बोटे तोडली जातील," असं गुहा यांनी म्हटलं आहे.