Panchayat 3 kabootar scene : फुलेरा गाव, तिथं असणारे नागरिक, तेथील पंचायत सचिव, सरपंच आणि उपसरपंचासह ग्रामसेवकाचे किस्से आणि त्यासोबत उलगडत जाणारं कथानक... म्हणजे 'पंचायत' ही सीरिज. वेब सीरिज विश्वात कमालीची लोकप्रियता मिळवलेल्या पंचायत या वेब सीरिजमध्ये साकारण्यात आलेल्या कथानकामध्ये सीरिजाच्या तिसऱ्या भागात एक Episode असा होता जिथं खासदार साहेब शांततेचं प्रतीक म्हणून कबुतर उडवण्याचा आग्रह करतात. नेत्यांचा हा हट्ट अखेर नाईलाजानं गावकरी आणि पंचायतीला पुरवावा लागतो.
हे महोदय ज्यावेळी कबुतर उडवतात तेव्हा हा पक्षी हवेत झेपावण्याऐवजी थेट जमिनीवर आदळतो. हे दृश्य अतिशय बोलकं असून सीरिजचं कथानक पुढे नेण्यात कमाल हातभार लावतं. असाच काहीसा प्रसंग नुकताच प्रत्यक्षातही घडल्याचं पाहायला मिळालं.
छत्तीसगढमधील मुंगेली गावामध्ये पंचायत-3 या वेब सीरिजमधील कबुतराचं ते दृश्य पुन्हा पाहायला मिळालं. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्तानं इथं पोलीस महानिरीक्षक सहभागी असणाऱ्या एका कार्यक्रमादरम्यान, त्यांनी हाती असणारं कबुतर हवेत उडवताच ते लगेचच जमिनीवर कोसळलं. पोलीस महानिरीक्षक एखाद्या कार्यक्रमासाठी येणं हा महत्त्वाचा क्षण असल्यामुळं या क्षणाचे साक्षीदार होणाऱ्या अनेकांनीच मोबाईल व्हिडीओमध्ये हा क्षण कैद करण्याचा प्रयत्न केला. पण, भलतंच काही कॅमेरात कैद झालं. कबुतर धाडकन खाली पडतानाचे क्षण कॅमेरानं टीपले आणि एका क्षणात हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
हाल ही में पंचायत सीरीज में कबूतर नहीं उड़ा था, छत्तीसगढ़ में ऐसा सच में हो गया..#Panchayat3 pic.twitter.com/CSf8GYJS20
— पुलिस छवि सुधार:-एक मुहिम (@policeimagerfms) August 19, 2024
मुंगेली येथील पोलीस महानिरीक्षकपदी सेवेत असणाऱ्या या अधिकाऱ्यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर कमाल व्हायरल होत असून, नेटकरी त्यावर बहुविध प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. सहसा मालिका किंवा वेब सीरिज यांच्या सुरुवातीलाच ही कलाकृती पूर्णपणे काल्पनिक असून, त्याचा प्रत्यक्ष व्यक्ती किंवा घटनांशी संबंध नसून, आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा असं Disclaimer देण्यात येतं. थोडक्यात कथानक काल्पनिक असल्याचं स्पष्ट केलं जातं. पण, या अशा घटनांचे व्हिडिओ समोर येतात आणि मग याच काल्पनिक घटना प्रत्यक्ष आयुष्याशी जोडण्यात येतात. तुम्ही पाहिला का हा व्हायरल होणारा व्हिडीओ?