कर्नाटकात कुमारस्वामी सरकार पुन्हा एकदा अडचणीत

काँग्रेसमधील असंतुष्ट आमदारांनी सरकारला अडचणीत आणण्याचा चंगच बाधलाय

Updated: Feb 6, 2019, 12:38 PM IST
कर्नाटकात कुमारस्वामी सरकार पुन्हा एकदा अडचणीत title=

बंगळुरू : काँग्रेसमधील अंतर्गत लाथाळ्यांमुळे कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांच्या अडचणींमध्ये वाढ झालीय. कर्नाटक सरकारच्या संयुक्त अधिवेशनात काँग्रेसचे ७ आमदार गैरहजर राहिलेत तर दोन अपक्षांचाही सत्ताधाऱ्यांशी संपर्क नाही. दुसरीकडं भाजपाचेही दोन आमदार गैरहजर आहेत. काठावरचं बहुमत असलेल्या कुमारस्वामी सरकारमध्ये सातत्यानं कुरबुरी सुरू आहेत. 

काँग्रेसमधील असंतुष्ट आमदारांनी सरकारला अडचणीत आणण्याचा चंगच बाधलाय. त्यामुळं कर्नाटकच्या विधिमंडळ अधिवेशात सत्ताधारी काँग्रेस-जनता दल धर्मनिपेक्ष आघाडी बॅकफूटवर गेलेली दिसतेय. भाजपानं मात्र सरकारविरोधात अविश्वास ठराव आणण्याचा विचार नसल्याचं जाहीर केलंय.

दुसरीकडे, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस आमदार गटाचे नेते सिद्धरमय्या यांनी पक्षाच्या असंतुष्ट नेत्यांना विधानसभा सत्रापूर्वी किंवा नंतर कारणे दाखवा नोटीस बजावलंय. यापूर्वी जानेवारी महिन्यातही सिद्धरमय्या यांनी काँग्रेस बैठकीच्या पार्श्वभूमीवर चार असंतुष्ट आमदारांना नोटीस बजावली होती. तसंच सर्व सदस्यांना बैठकीत उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते... उपस्थित न राहिल्यास कारवाईला सामोरं जाण्यास तयार राहण्याची तंबीही त्यांनी यावेळी नेत्यांना दिली होती.