नवी दिल्ली: कर्नाटकमध्ये सुरु असलेल्या राजकीय नाट्याचे पडसाद मंगळवारी पुन्हा एकदा संसदेत उमटले. कर्नाटकमध्ये भाजप सत्ताधारी पक्षाचे आमदार फोडत असल्याचा आरोप करत लोकसभेतील काँग्रेसचे नेते अधिर रंजन चौधरी यांनी सभागृहात घोषणाबाजी केली. यानंतर लोकसभेत एक दुर्मिळ चित्र पाहायला मिळाले. अधिर रंजन चौधरी यांच्यापाठोपाठ काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनीही भाजपविरोधात घोषणा द्यायला सुरुवात केली. मात्र, लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी काँग्रेसला अशाप्रकारे घोषणाबाजी करायला मज्जाव केला. या विषयावर सोमवारीच सभागृहात चर्चा झाली होती. या चर्चेला राजनाथ सिंह यांनी उत्तरही दिले होते, असे ओम बिर्ला यांनी सांगितले.
तेव्हा अधिर रंजन चौधरी यांनी तात्काळ कागदावर काही घोषणा लिहून पाठीमागे बसलेल्या सहकाऱ्यांना दिल्या. यानंतर काँग्रेसच्या इतर खासदारांनीही घोषणाबजीला सुरुवात केली. 'तानाशाही बंद करो', 'शिकार की राजनीती बंद करो, बंद करो', अशा घोषणांचा आवाज सभागृहात घुमत होता. त्यावेळी अचानक राहुल गांधीही या घोषणाबाजीत सामील झाले. ते पूर्ण घोषणा उच्चारत नसले तरी शेवटच्या शब्दांच्यावेळी ते इतरांबरोबर सामील होताना दिसले. यानंतर काँग्रेसचे खासदार सभागृहाच्या मधल्या भागात येऊन घोषणाबाजी करायला लागले.
भाजपने फोडाफोडीचे राजकारण बंद करावे. आज हे कर्नाटकात घडले उद्या मध्यप्रदेशात घडेल, असे काँग्रेसच्या नेत्यांनी सांगितले. यानंतर राहुल गांधी व सोनिया गांधी यांच्यासह काँग्रेसच्या सर्व खासदारांनी सभात्याग केला.
गेल्या दोन दिवसांपासून कर्नाटकात राजीनाम्याचा खेळ रंगला आहे. आतापर्यंत काँग्रेसच्या १३ आमदारांसह , सेक्युलर जनता दलातील काही आमदार आणि दोन अपक्ष आमदारांनी राजीमाने दिले आहेत. त्यामुळे काँग्रेस आणि जेडीएसचे सरकार पडण्याची चिन्हे आहेत. मात्र, विधानसभा अध्यक्षांनी यापैकी आठ आमदारांचे राजीनामे नाकारले आहेत. त्यामुळे आता कर्नाटकमध्ये काय घडणार, याची उत्सुकता राजकीय वर्तुळाला लागली आहे.