झारखंडच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार हेमंत सोरेन

सत्तेतून भाजपचा पायउतार करत मिळवला विजय... 

Updated: Dec 29, 2019, 07:27 AM IST
झारखंडच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार हेमंत सोरेन  title=
छाया सौजन्य- एएनआय

रांची : झारखंड मुक्ती मोर्चा JMM आणि आघाडीचे नेते हेमंत सोरेन Hemant Soren हे झारखंडचे ११वे मुख्यमंत्री म्हणून रविवारी शपथ घेतील. मोराबादी मैदानात हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. शपथविधी सोहळ्याचा हा दिवस झारखंडसाठी नवी पहाट आणणारा असल्यामुळे त्यांनी या दिवसाचा उल्लेख 'संकल्प दिवस' म्हणून केल्याची माहिती अधिकृत माहिती पत्रकात नमूद करण्यात आली आहे. 

राज्यपाल द्रौपदी मुरमू या सोरेन यांना पद आणि गोपनियतेची शपथ देतील. या शपथविधी सोहळ्यासाठी राजकीय वर्तुळातील अनेक नेत्यांची उपस्थिती असणार आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियांका गांधी वाड्रा, माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम, राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार, राजद नेते तेजस्वी यादव, सपा प्रमुख अखिलेश यादव या बड्या नेत्यांसह राजकीय विश्वातील आणि देशाच्या राजकारणात सक्रिय असणाऱे अनेक चेहरे या शपथविधी सोहळ्यात पाहायला मिळतील. 

सहा राज्याच्या मुख्यमंत्र्यांचीही या शपथविधी सोहळ्याला हजेरी असेल. ज्यामध्ये पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमल नाथ, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बाघल, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे या शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत. 

विविध राज्याच्या मुख्यमंत्र्यांशिवाय जनतेचं लक्ष वेधणाऱ्या चेहऱ्यांमध्ये एच.डी. कुमारस्वामी, के.सी. वेणुगोपाल, एन. चंद्राबाबू नायडू, हरिश रावत, शरद यादव आणि अहमद पटेल यांचा समावेश असेल. 

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच झालेल्या मतमोजणीमध्ये झारखंडच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावे शिक्कामोर्तब करण्यात आलं. झारखंड विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं. झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस-राजद आघाडीने या निवडणुकीत बाजी मारत भाजपला सत्तेतून पायउतार केलं. सोरेन यांच्या या विजयाबद्दल खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.