ED Arrests IAS Pooja Singhal: अंमलबजावणी संचालनालयाने (ED) आयएएस पूजा सिंघलला झारखंडमधल्या (Jharkhand) रांची (Ranchi) इथून अटक केली आहे. नुकत्याच झालेल्या छाप्यामध्ये आयएएस पूजा सिंघलच्या (IAS Pooja Singhal) घरातून कोट्यवधी रुपये जप्त करण्यात आले होते. IAS पूजा सिंघल याचा हिशेब देऊ शकली नाही, त्यानंतर ईडीने तिच्यावर ही कारवाई केली आहे. यापूर्वी ईडीने तिचे पती सीए सुमन कुमार यांना अटक केली होती.
ईडीने नुकतेच मनरेगा (MGNREGA) प्रकरणात झारखंडसह अनेक राज्यांमध्ये छापे टाकले होते. याप्रकरणी झारखंडच्या वरिष्ठ आयएएस पूजा सिंघल यांच्या घरावरही छापा टाकण्यात आला. पूजा सिंघल या सध्या झारखंड सरकारमध्ये खाण सचिव म्हणून कार्यरत आहेत.
ईडी मनी लाँड्रिंग प्रकरणाचा तपास करत आहे
हे प्रकरण झारखंडमध्ये 2020 मध्ये दाखल झालेल्या 16 प्रकरणांशी संबंधित आहे, ईडीने नंतर मनी लाँड्रिंगचा गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणी कनिष्ठ अभियंता राम विनोद प्रसाद सिन्हा यांना अटक करण्यात आली होती.
सरकारी निधीतून 18 कोटींचा घोटाळा
राम विनोद प्रसाद सिन्हा यांनी झारखंडमधील खुंटी जिल्ह्यात नियुक्ती असताना मनरेगाच्या सरकारी निधीतून 18 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. त्याचवेळी पूजा सिंघल याही तिथं जिल्हा दंडाधिकारी होत्या. झारखंड पोलिसांनी या प्रकरणी 16 एफआयआर नोंदवून तपास सुरू केला आणि राम विनोद प्रसाद सिन्हा याला अटक केली.
झारखंड पोलिसांनी या प्रकरणी आरोपपत्रही दाखल केलं आहे. या नोंदणीकृत प्रकरणांच्या आधारे, ईडीने मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला होता, ज्यामध्ये ईडीने राम विनोद प्रसाद सिन्हा यांची सुमारे 4.25 कोटींची मालमत्ता देखील जप्त केली होती.
ईडीने आतापर्यंत केलेल्या तपासानुसार, मनरेगा अंतर्गत खुंटी जिल्ह्यात झारखंड सरकारला दिलेल्या कामांपैकी राम विनोद प्रसाद सिन्हा आणि इतर आरोपींनी सरकारी तिजोरीतून 18 कोटी रुपये इतर खात्यांमध्ये हस्तांतरित केले.
कोळसा खरेदी झाली नसतानाही मेसर्स अरुणाचल प्रदेश मिनरल डेव्हलपमेंट अँड ट्रेडिंग कॉर्प लिमिटेडच्या कोळसा खरेदीच्या नावावर 75 लाख रुपये इटानगर इथल्या मेसर्स विजय बँकेत हस्तांतरित करण्यात आल्याचे ईडीला तपासात आढळून आलं. त्याआधारे ईडीने कारवाई करताना राम विनोद प्रसाद सिन्हा यांची सुमारे 4.25 कोटींची मालमत्ता जप्त केली होती.