नवी दिल्ली : उत्तर प्रदेशच्या समाजवादीच्या खासदार आणि बॉलिवूड अभिनेत्री जया बच्चन या राज्यसभेत सर्वात श्रीमंत सदस्य ठरणार आहेत.
जया बच्चन यांची संपत्ती तब्बल एक हजार कोटींच्या घरात आहे. याआधी भाजपाचे राज्यसभेतील खासदार रविंद्र किशोर सिन्हा हे सर्वात श्रीमंत खासदार म्हणून ओळखले जायचे. त्यांची संपत्ती आठशे कोटी रुपयांच्या घरात होती.
जया बच्चन यांची संपत्ती तब्बल १ हजार कोटींच्या घरात आहे. या बच्चन यांनी उमेदवारी अर्जासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातून त्यांच्या संपत्तीचा खुलासा झाला आहे. २०१४ मध्ये भाजपच्या तिकीटावर राज्यसभा निवडणूक लढवलेले खासदार रवींद्र सिन्हा यांच्याकडे ८०० कोटी रूपयांची संपत्ती आहे.
प्रतिज्ञापत्रात जया बच्चन यांनी सांगितले की, त्यांच्याकडे आणि त्यांचे पती अमिताभ बच्चन यांची एकूण संपत्ती २०१२ मध्ये साधारण ५०० कोटींच्या दुप्पट होऊन यावर्षी १ हजार कोटी झाली आहे. जया बच्चन यांच्या नावावर बॅंक आणि आर्थिक संस्थेंचं ८७ कोटी ३२ लाख ६२ हजार ०८५ रूपये कर्ज आहे. तर अमिताभ बच्चन यांच्यावर १८ कोटी २८ लाख २० हजार ९५१ रूपये कर्ज आहे.
संपत्तीच्या बाबतीत अमिताभ बच्चन हे जया यांच्यापेक्षा अधिक श्रीमंत आहेत. या बच्चन आणि अमिताभ बच्चन यांच्या नावे ४६० कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता असून ५४० कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आहे. बच्चन दाम्पत्याकडे सोने, चांदी, हिरे जडजवारे असे ६२ कोटी रुपयांचे दागिने आहेत. यात जया बच्चन यांच्याकडील २६ कोटींच्या दागिन्यांचा समावेश आहे.
तर बच्चन दाम्पत्याकडे १२ गाड्या असून याची किंमत १३ कोटी रुपयांच्या घरात आहे. यामध्ये मर्सिडिज, पॉर्शे आणि टाटा नॅनो अशा कारचा समावेश आहे. फ्रान्समध्येही बच्चन दाम्पत्याची संपत्ती असून याशिवाय नोएडा, भोपाळ, पुणे, अहमदनगर आणि गांधीनगर या शहरांमध्येही त्यांची जागा आहे.
जया बच्चन यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमिताभ बच्चन यांची खाती लंडन, फ्रान्स, दुबई आणि पॅरिसहीत देश-विदेशातील १९ बॅंकांमध्ये आहेत. यातील चार बॅंक खाती जया बच्चन यांची आहेत. या खात्यांमध्ये ६.८४ कोटी रूपये जमा आहेत.