IT Sector Jobs: तुम्ही किंवा तुमच्या ओळखीत कोणी आयटी क्षेत्रात नोकरी शोधतंय? मग ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. आयटी क्षेत्रात नोकऱ्यांचा पाऊस पुन्हा येणार आहे. इन्फोसि आणि टीसीएसने नोकर भरती जाहीर केली आहे. इन्फोसिस फ्रेशर्सना 9 लाख तर टीसीएस फ्रेशर्सना 11 लाख रुपयांपर्यंत पॅकेज देतंय. एका रिपोर्टनुसार आयटी सेक्टरची दिग्गज कंपनी इन्फोसिसने कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्ह (Campus Placement Drives) अंतर्गत नव्या पॉवर प्रोग्रामची सुरुवात केली आहे. इन्फोसिस कंपनी सर्वसाधारणपणे तीन ते साडेतीन लाखाचे वार्षिक पॅकेज ऑफर करते. पण आता येथे तुम्हाला वार्षिक 9 लाख रुपयांपर्यंत पगार मिळेल.
पॉवर प्रोग्राम अंतर्गत कंपनी स्पेशलाइज्डची निवड करणार आहे. अर्जदार उमेदवाराकडे कोडींग, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आणि प्रोग्रामिंग यापैकी कशाचे तरी स्पेशलायजेशन असेल तर इन्फोसिस कंपनी तुम्हाला 4 ते 6.5 लाख रुपयांपासून 9 लाखांपर्यंत पॅकेज ऑफर करेल. उमेदवाराकडे कशाचे स्पेशलायजेशन आहे, यावर हा पगार ठरेल. टीसीएसच्या प्रोग्रामला उत्तर देताना इन्फोसिसने हा प्रोग्राम जाहीर केल्याचे म्हटले जात आहे.
टाटा ग्रुपची कंपनी टीसीएस आपल्या प्राइम प्रोग्रामसाठी 9 लाख ते 11 लाख रुपयापर्यंत वार्षिक पॅकेज देतेय. टीसीएस प्राइम प्रोग्राम अंतर्गत आर्टिफिशियल इंटेलिजन्स, जनरेटिव्ह एआय आणि मशिन लर्निंग सारख्या नव्या तंत्रज्ञानाच्या नोकऱ्यांचादेखील समावेश आहे. टीसीएस आता 3 प्रकारच्या फ्रेशर्सची निवड करतेय. ज्यामध्ये पहिले पॅकेज 3.6 लाख रुपये, दुसरे डिजिटल पॅकेज 7.5 लाख रुपये आणि तिसरे प्राइम पॅकेज आहे.
फ्रेशर्स असूनही तुमच्याकडे संबंधित विषयात स्पेशलायजेशन असेल तर तुम्हाला येथील चांगल्या पगाराच्या नोकरीत प्राधान्य दिले जाईल. इन्फोसिस आणि टीसीसएस दोन्ही कंपन्या स्पेशलाइज्डना सर्वाधिक नोकऱ्या देऊ इच्छित आहे. डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनमुळे हे होतंय. बाजारातील बदलत्या स्थितीमध्ये 15 ते 20 हजार फ्रेशर्सना नोकरी देण्याचा इन्फोसिसचा विचार आहे. टीसीएस 40 हजार फ्रेशर्सची भरती करण्याच्या तयारीत आहे. सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, एआय जनरेटिव्ह, मशिन लर्निंगमध्ये नोकरीची संधी मिळणार आहे.