Business News : देशातील सर्वात मोठ्या उद्योजक कुटुंबांमध्ये ज्यांची गणना होते अशा अंबानी आणि टाटा कुटुंबाचं या क्षेत्रामध्ये इथून पुढं थेट स्पर्धा होताना दिसणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या दोन्ही कुटुंबातील वरिष्ठ पिढी आता थेट सक्रिय राहणार नसून बरीच जबाबदारी तरुण पिढीवर सोपवण्यात आली आहे. त्यामुळं उद्योग जगतामध्ये खऱ्या अर्थानं नवी क्रांती घडणार अशीच अपेक्षा या क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळींनी दिली आहे.
नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार 32 वर्षीय नेविल टाटा यांनी टाटा समुहाच्याच स्टार बाजारच्या प्रमुखपदाची धुरा सांभाळली असून, हे या समुहातील रिटेल कंपनी ट्रेंट लिमिटेडचं एक हायपरमार्केट युनिट आहे. नेविलच्या या नव्या जबबादारीला थेट आव्हान असणार आहे ते म्हणजे ईशा अंबानीच्या रिलायन्स रिटेलचं. देशातील दोन्ही महत्त्वाच्या उद्योजक कुटुंबातील पुढची पिढी आता एकमेकांना आव्हान देणार असल्यामुळं त्यात कोण बाजी मारतं याकडे व्यवसाय विश्वेषकांचं लक्ष असेल.
नेविल टाटा ट्रेंट लिमिटेडच्या अध्यक्षपदी असून, नोएल टाटा यांचा हा चिरंजीव. नोएल टाटा हे सन्सचे सर्वेसर्वा (Ratan Tata) रतन टाटा यांचे सावत्र बंधू. नोएल टाटा हे व्होल्टासच्या अध्यक्षपदी असून, ते टाटा समुहाच्या विश्वस मंडळाचाही एक भाग आहेत. दरम्यान, नोएल यांचा मुलगा नेविल टाटा उद्योग समुहाच्या ग्रोसरी रिटेल सब्सिडियरी ट्रेंड हायपरमार्केटच्या नियामक मंडळात नॉन एक्झेक्युटीव्ह डायरेक्टर म्हणून जबाबदारी पाहत होता. सूत्रांच्या माहितीनुसार एक्झेक्युटीव्ह पदाची जबाबदारी मिळाल्यानंतर त्यानं पूर्वीच्या पदाचा राजीनामा दिला.
काही वर्षांपूर्वीच नेविलनं टाटा समुहातील हायपरमार्केट क्षेत्रामध्ये योगदान देण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर तो उच्च शिक्षणासाठी परदेशात रवाना झाला. त्यानंतर आता पुन्हा एकदा नेविलवर टाटा समुहाकडून महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्याच्या अख्तयारित येणाऱ्या ट्रेंड लिमिटेड हायपरमार्केट बिझनेसमध्ये टाटाच्या वेस्टसाईड (Westside), झुडिओ (Zudio) आणि झारा (Zara) या ब्रँडचाही समावेश आहे.
टाटा समुहाशी दीर्घ काळापासून जोडल्या गेलेल्य़ा नेविलनं आतापर्यंत पॅकेज्ड फूड आणि बेवरेज उत्पादन व्यवसायांचंही नेतृत्वं केलं होतं. यानंतर त्यानं झुडिओची जबाबजारी सांभाळली. आजच्या घडीला हा ब्रँड देशभरातील सर्वात मोठ्या आणि अनेकांच्याच खिशाला परवडणाऱ्या फॅशन ब्रँडपैकी एक आहे.
तज्ज्ञांच्या माहितीनुसार नेविल टाटाला मिळालेल्या या नव्या जबाबदारीमध्ये त्याला कुटुंबातील वरिष्ठांची थेट मदत आणि मार्गदर्शन मिळणार आहे. पक्त नेविलच नव्हे, तर नोएल टाटा यांच्या मुलीसुद्धा टाटा समुहामध्ये सक्रिय सहभाग घेताना दिसत आहेत. त्यापैकी 39 वर्षीय लीह टाटाकडे हल्लीच इंडियन हॉटेल्स गेटवे ब्रँडची जबाबदारी देण्यात आली. तर, 36 वर्षीय माया टाटासुद्धा सध्या टाटा डिजिटलमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देताना दिसत आहे. पण, सध्या मात्र सर्व लक्ष लागलं आहे ते म्हणजे देशाली सर्वात मोठी रिटेल चेन सांभाळणाऱ्या (Isha Ambani) ईशा अंबानी आणि टाटा समुहाची धुरा सांभाळलेल्या नेविल टाटा यांच्या व्यवसाय कौशल्यावर.
दरम्यान, नोएल यांची मुलं लीड, नेविल आणि माया या तिघांनाही टाटा समुहातील पाच विश्वस्तांच्या मंडळातही सहभागी करण्यात आलं आहे. या विश्वस्त मंडळाचा थेट संबंध सर जोराबजी टाटा ट्रस्ट आणि सर रतन टाटा ट्रस्ट यांच्याशी आहे. सूत्रांच्या माहितीनुसार टाटांच्या या विश्वस्त मंडळाची टाटा सन्समध्ये 66 टक्क्यांची भागिदारी आहे.