ISRO Gaganyaan : भारताचे चांद्रयान-3 (Chandrayaan-3) 23 ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर लँडींग करणार आहे. भारताची चांद्रयान-3 मोहिम यशस्वी टप्प्यात आली आहे. दुसरीकडे चांद्रयान-3 मोहिमेसोबतच भारतीय अंतराळ संशोधन संस्था (Indian Space Research Organisation) म्हणजेच इस्रो (ISRO) आणखी एक महत्वकांक्षी मोहिमेवर काम करत आहे. ही मोहिम म्हणजे भारताची गगनयान अंतराळ मोहीम (ISRO Gaganyaan Mission). या मोहिमेअंतर्गत इस्त्रो मानवाला अवकाशात पाठवणार आहे. इस्त्रो गगनयान मोहिमेबाबत मोठी अपडेट सोमर आली आहे. या मोहिमेअंतर्गत अंतराळवीरांच्या सुरक्षित लँडिंगसाठी ड्रोग पॅराशूटची चाचणी यशस्वी झाली आहे.
इस्त्रोने गगनयान मोहिमेसाठी ड्रोग पॅराशूटची यशस्वी चाचणी केली आहे. विक्रम साराभाई स्पेस सेंटरच्या माध्यमातून 8 ते 10 ऑगस्ट दरम्यान चंदीगडच्या टर्मिनल बॅलिस्टिक रिसर्च लॅबोरेटरीच्या टेल ट्रॅक्ड रॉकेट स्लेज (RTRS) वर या ड्रोग पॅटाशूटची यशस्वी चाचणी केली गेली. हे पॅराशूट अंतराळवीरांच्या सुरक्षित लँडिंगसाठी मदत करेल. यामुळे क्रू मॉड्युलचा वेग कमी होईल, तसेच ते स्थिर राहील. याबाबत इस्रोने व्हिडिओ जारी करून माहिती दिली. या मिशनमध्ये वापरलेले ड्रॉग पॅराशूट पायरो-आधारित उपकरणांमध्ये पॅक केलेले आहेत. जे पॅराशूटला कमांडवर हवेत फायर करता यावेत म्हणजे हवेतच काही क्षणात उघडले जावेत अशा पद्धतीने डिजाईन केलेले आहेत.
यापूर्वी 20 जुलै रोजी इस्रोच्या गगनयान सर्व्हिस मॉड्युल प्रोपल्शन सिस्टीम (Service Module Propulsion System) ची चाचणी यशस्वी झाली होती. गगनयानचे सर्व्हिस मॉड्युल एक नियंत्रित द्वि-प्रोपेलेंट आधारित प्रणाली आहे. जी ऑर्बिटल मॉड्यूलच्या गरजा पूर्ण करते. यामध्ये ऑर्बिट इंजेक्शन, परिक्रमा, ऑन-ऑर्बिट कंट्रोल, डी-बूस्ट मॅन्युव्हरिंग आणि चढाईच्या टप्प्यात मदत करते. इस्रोने ट्वीट करत ही माहिती दिली होती. सर्व्हिस मॉड्यूलमध्ये सिस्टीम हे अंतराळयानाचे इंजिन आहे. हे मुख्य प्रोपल्शन इंजिन असते. सर्व्हिस मॉड्यूलमध्ये सिस्टीमच्या मदतीने अंतराळयानाला चंद्राभोवती कक्षेत ठेवण्यासाठी आणि चंद्रावरून पृथ्वीच्या दिशेने पाठवण्यासाठी मदत करते.
केंद्र सरकारने गगनयान मोहिमेसाठी 10,000 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. गगनयान मिशन 2022 पर्यंत पूर्ण करायचे होते, पण कोरोनामुळे त्याला विलंब झाला आहे. गगनयान मोहिमे अंतर्गत अंतराळवीर 3 दिवस अंतराळात राहणार आहेत. यानंतर अंतराळवीर पृथ्वीवर परतणार आहे.