नवी दिल्ली: सध्या देशभरात राम मंदिराच्या मुद्द्यावरून सुरु असणाऱ्या राजकारणावरून नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांनी भाजपला लक्ष्य केले. श्रीराम स्वर्गातून पृथ्वीवर अवतरला तर शेतकऱ्यांसाठी अच्छे दिन येणार आहेत का, असा सवाल त्यांनी विचारला. लोकशाही आणि निधर्मी असलेल्या भारताची सध्याची अवस्था पाहा. लोकांना भेडसावणाऱ्या समस्यांविषयी तुम्ही बोलतच नाही. तुम्ही केवळ राम मंदिराच्या मुद्द्यावर भांडत आहात. उद्या राम स्वर्गातून पृथ्वीतलावर अवतरला तर शेतकऱ्यांची स्थिती सुधारणार आहे का? रामाच्या येण्याने देशातील बेरोजगारी एका झटक्यात नाहीशी होणार आहे का? मात्र, सध्या लोकांना केवळ मुर्ख बनवले जात आहे, अशी टीका फारुख अब्दुल्ला यांनी केली.
Farooq Abdullah: Today, look at secular democratic India. You’re not fighting on issues that matter to ppl. You’re fighting for Ram. Is Ram going to come from heaven&give farmers something better?Or unemployment will disappear in a day because Ram is coming. They are fooling ppl. pic.twitter.com/NiNKyKvFKG
— ANI (@ANI) December 8, 2018
आगामी सार्वत्रिक निवडणुकांच्या तोंडावर राम मंदिराच्या मुद्द्यावरून देशातील वातावरण कमालीचे तापले आहे. जानेवारी महिन्यात सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. मात्र, त्यापूर्वीच सरकारने अध्यादेश काढावा, अशी मागणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विहिंप या संघटनांनी लावून धरली आहे. गेल्याच महिन्यात भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेला अयोध्या दौराही चांगलाच गाजला होता. यावेळी उद्धव ठाकरे यांनी 'पहले मंदिर, फिर सरकार', असा नारा दिला होता. तर सरसंघचालक मोहन भागवत यांनीही राम मंदिराच्या उभारणीसाठी आणखी वाट पाहता येणार नाही असे सांगत लोकांना जनांदोलन उभारण्याचे आवाहन केले होते.