नवी दिल्ली : कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात लॉकडाऊनचा निर्णय घेतला. त्यामुळे सर्व उद्योग ठप्प होत असलेले पाहून परप्रांतीय मजुरांनी हाती रोजगार नसल्यामुळे आपला मोर्चा आपल्या राज्याकडे वळवला. शिवाय आता तापमानाचा पारा देखील चांगलाच चाढला आहे. अशा परिस्थितीत मजुरांना प्रवास करणं फार कठिण असल्यामुळे त्यांची तहान भागवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. श्रमिक रेल्वेमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रेल्वे प्रशासन खाण्यासोबत ४ पाण्याच्या मोफत बाटल्या देणार आहे.
त्याचप्रमाणे प्रवास जर लांबचा असेल तर रेल्वे प्रशासनाकडून ५ पाण्याच्या बाटल्यांचा पुरवठा करण्यात येणार आहे. वाढत्या उष्णतेमुळे रेल्वे विभागाने हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. अशा कडाक्याच्या गर्मीमध्ये विना वातानुकुलीत डब्ब्यातून प्रवास करताना अनेक अडचणींना सामोरं जाव लागतं .
आयआरसीटीसीच्या अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देशात कुठेही रेल्वेच्या नीरच्या पाण्याच्या बाटल्या कमी पडत नाहीत. कारण यासाठी सर्व विभागांमध्ये काम सुरू केले आहे. रेल्वे प्रवाशांना शुद्ध पाणी पुरवण्याच्या दृष्टीने रेल्वेने ‘रेल नीर’ही संकल्पना आणली. त्यानुसार २००३ मध्ये दिल्लीत पहिला ‘रेल नीर’ प्रकल्प सुरू करण्यात आला.
मुंबईत ‘रेल नीर’चा प्रकल्प २०१४ पासून सुरू करण्यात आला, या प्रकल्पाच्या माध्यमातून संपूर्ण देशात तब्बल ११ लाख पाण्याच्या बाटल्यांचे उत्पादन केले जाते.