पेन्शनर्ससाठी आनंदाची बातमी! ज्येष्ठ नागरिकांना घरबसल्या मिळणार 'ही' सुविधा

What is Integrated Pensioner Portal: पेन्शन सेवा डिजिटल करुन पेन्शनर्सचे आयुष्य सुलभ करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

Pravin Dabholkar | Updated: May 5, 2024, 08:11 AM IST
पेन्शनर्ससाठी आनंदाची बातमी! ज्येष्ठ नागरिकांना घरबसल्या मिळणार 'ही' सुविधा title=
Integrated Pensioner Portal

What is Integrated Pensioner Portal: तुम्ही सरकारी कर्मचारी आहात? तुमच्या घरी कोणी पेन्शनर्स असतील तर ही अपडेट तुमच्यासाठी महत्वाची आहे. तुमच्या घरी कोणाला पेन्शन सुरु असेल तर घरातील त्या व्यक्तीला दर महिन्याला बॅंकेत जावे लागते. ती व्यक्ती वयाने खूपच मोठी असेल तर घरातील सदस्याला त्यांच्यासोबत जावे लागते. पण आता केंद्र सरकारने स्टेट बॅंक ऑफ इंडियासोबत मिळून पेन्शनर्ससाठी नवे ऑनलाईन पोर्टल सुरु केले आहे. एकीकृत पेन्शनर पोर्टल असे या पोर्टलचे नाव आहे. या पोर्टलद्वारे 5 बॅंकांची पेन्शन प्रोसेस आणि पेमेंट सर्व्हिस एकाच ठिकाणी होणार आहे. पेन्शन सेवा डिजिटल करुन पेन्शनर्सचे आयुष्य सुलभ करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पेन्शन आणि पेन्शनर्स कल्याण विभागाकडून याबद्दलची माहीती देण्यात आली आहे.

पेन्शन पावती आणि फॉर्म 16 ची सुविधा 

ही सुविधा सुरु झाल्यानंतर 5 बॅंकांशी संबंधित पेन्शनर्सना आपल्या महत्वाच्या कामांसाठी दरवेळेस बॅंकेत जाण्याची गरज नाही. जसं की पेन्शनची पावती, लाइफ सर्टिफिकेट जमा करणे, मिळालेल्या किंवा भरलेल्या पैशांची नोंद तसेच फॉर्म 16 या सुविधा तुम्हाला पोर्टलवर मिळणार आहेत. 

रिटायर्ट व्यक्ती येथे सर्व मासिक पेन्शनची नोंद पाहू शकतात. यासोबतच लाइफ सर्टिफिकेट कधी जमा करण्याचे याची माहिती त्यांना मिळेल. एवढेच नव्हे तर येथूनच तुम्हाला फॉर्म 16 देखील मिळणार आहे. सुरुवातीला ही सुविधा फक्त एसबीआयच्या पेन्शनर्ससाठी होती. पण आता एसबीआयसोबतच, बॅंक ऑफ बडोदा, पंजाब नॅशनल बॅंक आणि कॅनरा बॅंकेचे पेन्शनर्सदेखील या पोर्टलच्या सुविधेचा लाभ घेऊ शकतात. 

निवृत्त झालेल्यांसाठी सरकारची सुविधा 

सरकारकडून निवृत्ती धारकांना डिजिटल जगाशी जोडण्यासाठी वेगवेगळे मार्ग अवलंबण्यात येत आहेत. या अंतर्गत लाइफ सर्टिफिकेट सोबतच 'भविष्य' पोर्टलची सुविधादेखील मिळणार आहे. भविष्य पोर्टल हे इंटीग्रेटेड पेन्शनर पोर्टलचा मुख्य भाग आहे. सुरुवातीपासून शेवटपर्यंत पेन्शनची प्रक्रिया आणि पेमेंट डिजिटल बनवणे हे याचे उद्दीष्ट आहे. यामध्ये रिटायर्ट होणाऱ्या कर्मचाऱ्याला आपले दस्तावेज ऑनलाईन जमा करणे, इलेक्ट्रॉनिक फॉर्मेटमध्ये पेन्शन पेमेंट ते डिजिलॉकरमध्ये पाठवण्याची सुविधा याअंतर्गत मिळेल. 

इंटीग्रेटेड पेन्शन प्लॅटफॉर्म काय आहे?

पेन्शन प्रक्रिया आणि पेमेंट यंत्रणा डिजिटल बनवण्यासाठी वेब पोर्टल तयार करण्यात आले आहे. पेन्शन संदर्भातील सेवांमध्ये पारदर्शकता आणणे हे याचे मुख्य उद्दीष्ट्य आहे. या सेवेमुळे पेन्शनर्सचे वैयक्तिक आणि पेन्शन सेवेशी संबंधित व्यवहारांची नोंद केली जाईल. ज्यामध्ये पेन्शन फॉर्म ऑनलाईन जमा करण्याच्या सुविधेचा समावेश आहे. यासोबतच रिटायर्ट नागरिकांना पेन्शनसंदर्भात एसएमएस किंवा ईमेलच्या माध्यमातून सूचना दिल्या जाणार आहेत. याद्वारे या संपूर्ण प्रक्रियेची अपडेट पेन्शनर्सना मिळत राहणार आहे.