नवी दिल्ली - हवाई वाहतूक करणाऱ्या प्रवाशांच्या दृष्टीने इंडिगो ही सर्वात वाईट परफॉर्म करणारी कंपनी असल्याचे नागरी हवाई वाहतुकीसंदर्भातील संसदीय समितीने म्हटले आहे. त्याचवेळी या समितीने एअर इंडियाचे प्रवासी सामान वाहतूक (लगेज पॉलिसी) धोरण सर्वोत्कृष्ट असल्याचे प्रशस्तिपत्रक दिले आहे. संसदेच्या पर्यटन, सांस्कृतिक कार्यक्रम, रस्ते, जल आणि हवाई वाहतूक या विषयांवरील स्थायी समितीचे अध्यक्ष असलेले तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांनी हा अहवाल दिला आहे. सणासुदीच्या काळात काही खासगी हवाई वाहतूक कंपन्या नेहमीच्या प्रवासी भाड्यापेक्षा ८ ते १० टक्के जास्त दर आकारतात, याची समितीने नोंद घेतली असल्याचे त्यांनी सांगितले.
समितीच्या ताज्या अहवालावर पत्रकारांशी संवाद साधताना डेरेक ओब्रायन म्हणाले, प्रवाशांच्या दृष्टीने सर्वात वाईट परफॉर्म करणारी खासगी हवाई वाहतूक कंपनी इंडिगो आहे. समितीच्या सर्व ३० खासदारांचे यावर एकमत झाले. सातत्याने तक्रारी करूनही इंडिगोकडून त्याला कोणताच प्रतिसाद दिला जात नाही. प्रवाशांसोबत त्यांच्या कर्मचाऱ्यांचे वागणे अजिबात स्वीकारार्ह नसून, केवळ १ किंवा २ किलो जास्त वजन असेल तरी त्यांच्याकडून प्रवाशांना अजिबात सहकार्य केले जात नाही. जवळपास सर्वच खासगी विमान कंपन्यांच्या काम करण्याच्या पद्धतीवर समितीतील प्रत्येक सदस्याला आक्षेप आहे. पण इंडिगोचा विचार केल्यावर त्यांचा परफॉर्मन्स सर्वांत वाईट आहे. समितीने हा विषय गंभीरपणे घेतला असून, लवकरच त्यावर उपाय योजले जातील.
इंडिगोबाबतची मते माझी एकट्याची नसून, समितीतील सर्वांचीच आहे. समितीमध्ये सर्वच राजकीय पक्षांचे प्रतिनिधी असतात, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. ते म्हणाले, नागरी हवाई वाहतूक क्षेत्रात सध्या अनेक समस्या आहेत. तिकीट रद्द करण्याचे शुल्क मूळ प्रवासी शुल्काच्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त असू नये. कर आणि इंधन अधिभाराचे प्रवाशांकडून घेतलेले शुल्कही या स्थितीत त्यांना परत केले पाहिजे. पण तसे होताना दिसत नाही. हवाई वाहतूक कंपन्या प्रवाशांकडून भरमसाठ पैसे उकळतात.
एअर इंडियाचे प्रवासी सामान वाहतूक धोरण सर्वोत्कृष्ट आहे. इतरही खासगी विमान कंपन्यांनी या धोरणाकडे गंभीरपणे बघितले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.