माझी चूक झाली, मला माफ करा; संतापी खासदारांना उपरती

पत्रकाराला धमकावण्याचे गंभीर पडसाद गुरुवारी माध्यमविश्वात उमटले.

Updated: Dec 28, 2018, 09:01 AM IST
माझी चूक झाली, मला माफ करा; संतापी खासदारांना उपरती title=

नवी दिल्ली - पत्रकाराच्या प्रश्नावरून चिडलेल्या आणि त्याला धमकावलेल्या ऑल इंडिया युनायटेड डेमॉक्रॅटिक फ्रंटे अध्यक्ष आणि खासदार बदरुद्दीन अजमल यांना अखेर उपरती झाली असून, त्यांनी घडल्या प्रकाराबद्दल माफी मागितली आहे. मी गेल्या १३ वर्षांपासून राजकारणात आहे. याआधी माझ्याकडून असे कधीच घडले नव्हते. माझी चूक झाली. मला माफ करा. मी तसं वागायला नको होतं, हे मला मान्य आहे, या शब्दांत बदरुद्दीन अजमल यांनी आपला माफीनामा सादर केला. दरम्यान, पत्रकाराला धमकावण्याचे गंभीर पडसाद गुरुवारी माध्यमविश्वात उमटले. बदरुद्दीन अजमल यांच्या वर्तणुकीची सर्वांनीच निंदा केली. त्यानंतर याविरोधात आंदोलन छेडण्यात येईल, हे लक्षात येताच बदरुद्दीन अजमल यांनी माफीनामा सादर केला.

श्रमिक पत्रकारांच्या संघटना, राजकीय पक्ष आणि इतर अनेक संघटनांनी त्यांच्या विधानावर जोरदार आक्षेप घेतला होता. बदरुद्दीन अजमल म्हणाले, माध्यमे हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. मी कायमच पत्रकारांचा आदर केला आहे आणि माझ्यासोबत असणाऱ्यांना याची माहिती आहे. त्या दिवशी घडलेली घटना एकदम उत्स्फूर्त होती. मी जाणीवपूर्वक काहीही केलेले नाही. तरीही घडल्या प्रकाराबद्दल मी माफी मागतो.

तुझं डोक फोडेन, पत्रकाराच्या प्रश्नावरून रागावलेल्या खासदाराची प्रतिक्रिया

बदरुद्दीन अजमल यांना पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने प्रश्न विचारल्यावर त्यांचा राग अनावर झाला होता. त्यांनी कॅमेऱ्यासमोरच पत्रकाराच्या हातातील बूम फेकून दिला आणि ते त्याच्यावरच भडकले. त्याचे डोकं फोडण्याची धमकीही अजमल यांनी दिली. पुढच्यावर्षी होत असलेल्या लोकसभा निवडणुकीत तुम्ही कोणासोबत आहात, अशा आशयाचा प्रश्न विचारल्यावर अजमल यांना राग आला होता. 

अजमल यांनी लगेचच आक्षेपार्ह शब्दांत पत्रकाराशी बोलण्यास सुरुवात केली. त्यांना राग आल्याचे बघितल्यावर पत्रकार परिषदेला उपस्थित असलेल्या पक्षाच्या इतर नेत्यांनी अजमल यांना रोखण्याचा प्रयत्न केला. पण ते कोणाचेच ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याचे चित्रीकरणावरून दिसते. चिडलेल्या अवस्थेतच त्यांनी संबंधित पत्रकाराला तुझं डोकं फोडेन, अशी धमकीच दिली. या प्रकारामुळे काहीवेळ घटनास्थळी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.