Railway Reply On Bride Groom News: भारतीय रेल्वेने दररोज कोट्यवधी लोकं प्रवास करत असतात. प्रत्येकाला दरवेळेस नवनवे अनुभव येत असतात. कोणाला चांगला अनुभव येतो तर कधी कोणाला वाईट अनुभव येतो. सध्या सोशल मीडियाच्या जमान्यात प्रवाशांचे अनुभव क्षणार्धात रेल्वेपर्यंत पोहोचतात. यावर वेगवेगळ्या प्रतिक्रियाही येतात. अलीकडेच असाच एक फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला. ज्यामध्ये लग्न झालेली नवरी सीट न मिळाल्याने खाली बसलेली दिसतेय. यानंतर तिच्या नवऱ्याने रेल्वेला उद्देशून ट्विट केले, ज्याला आता रेल्वेकडूनही रिप्लाय आलाय.
तुम्ही लापता लेडीज सिनेमा पाहिला असेल तर त्यात लाल रंगाच्या शालूमध्ये नववधू रेल्वे प्रवास करताना दिसतात. अशाच प्रकारचा फोटो सोशल मीडियात व्हायरल होतोय. ज्या फोटोत ट्रेनमध्ये नुकतेच लग्न झालेली तरुणी दिसतेय. ती ट्रेनच्या दरवाजाजवळ बसली असून तिच्याजवळ सामान असल्याचेही फोटोमध्ये दिसतंय. या फोटोमुळे सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलंय. तसेच यानिमित्ताने भारतीय रेल्वेच्या पायाभूत सुविधा, वर्गीय भेदभाव आणि भारतातील विवाहांची स्थिती यावर चर्चा रंगताना दिसत आहेत.
Thank you @AshwiniVaishnaw ji because of you my wife is getting this world class Train facility today.
I will always be indebted to you pic.twitter.com/w9W2WwLK90
— Jitesh (@Chaotic_mind99) November 19, 2024
जितेश नावाच्या युजरने एक फोटो शेअर केलाय. ज्यात तो लिहितो, 'धन्यवाद अश्विनी वैष्णवजी, तुमच्यामुळे माझ्या पत्नीला आज जगातील सर्वोत्तम क्लास ट्रेनची सुविधा मिळत आहे. मी तुमचा सदैव ऋणी राहीन.' या पोस्टनंतर रेल्वे प्रशासनाकडूनही ट्विट करत प्रश्न विचारण्यात आला आहे. जितेशकडून 19 नोव्हेंबरला 10 वाजून 5 मिनिटांनी ही पोस्ट करण्यात आली. यानंतर रेल्वेकडून याला उत्तर देण्यात आले आहे.
'आम्ही अजूनही तपशीलांची (मोबाईल नंबर आणि पीएनआर नंबर/ट्रेन नंबर) वाट पाहत आहोत. जेणेकरून आम्ही तुमची तक्रार नोंदवू शकू आणि त्याचे निराकरण जलद करू शकू,' असे रेल्वेने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे.
ही पोस्ट एका सोशल मीडिया इन्फ्लुएंसरने शेअर केली होती. ज्यामध्ये त्याने या फोटोसोबत एक मेसेजही शेअर केला होता. मेसेजमध्ये म्हटलं की, 'तुमच्या मुलींचे लग्न अशा पुरुषाशी करू नका जो आपल्या पत्नीसाठी आणि स्वत:च्या राहणीमानाची व्यवस्था करू शकत नाही. असे झाल्यास आर्थिक संकटामुळे घरगुती वाद निर्माण होतील.' ही पोस्ट अनेक मुलींच्या आणि त्यांच्या पालकांच्या जिव्हारी लागली. त्यामुळे ही पोस्ट बघता बघता खूपच व्हायरल झाली. अनेक यूजर्स यावर आपली प्रतिक्रिया नोंदवू लागले. तसेच काहीजण चिंताही व्यक्त करु लागले.
नववधूला सन्मानपूर्वक आराम मिळण्याची आवश्यकता असताना तिला असा प्रवास करावा लागतोय, असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला. या फोटोच्या माध्यमातून रेल्वेच्या सुविधांवर सोशल मीडियावर गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. 'भारतीय रेल्वेच्या गाड्या खरोखरच इतक्या वाईट आहेत का की वधूला बसून प्रवास करावा लागतो? असा प्रश्न विचारला जातोय.
We are still waiting for details (Mobile Number and PNR No/TRAIN NO.) so that we register your complaint and expedite resolution.
— RailwaySeva (@RailwaySeva) November 19, 2024
फोटोसह मेसेज पोस्ट केल्यानंतर काही युजर्सनी पोस्टच्या सत्यतेवरही प्रश्न उपस्थित केले आहेत. एका युजरने लिहिले, 'हे ट्विट खोटे आहे, कृपया याची चौकशी करून संबंधित व्यक्तीला तुरुंगात पाठवा', तर दुसऱ्या युजरने लिहिले, 'तिकिट न घेता हा प्रवास सुरु आहे, पोस्ट व्हायरल होण्यासाठी ही स्टॅटर्जी वापरली असू शकते' 'काही लोक फक्त चर्चेत राहण्यासाठी अशा पोस्ट करतात, हा केवळ एक स्टंट असू शकतो, जो लोकांचे लक्ष वेधण्यासाठी करण्यात आलाय', अशी प्रतिक्रिया एकाने दिली आहे. लोकं काहीही पडताळणी न करता पोस्ट व्हायरल करतात, त्यामुळे सोशल मीडियावर पसरलेल्या पोस्टमध्ये कितपत तथ्य आहे, हे सांगणे कठीण असल्याची प्रतिक्रिया एकाने दिली आहे.