दारुगोळा साठवण्यासाठी भारतीय लष्कराकडून सीमारेषेवर विशेष भुयारांची उभारणी

भारतीय लष्कराने यापूर्वी अशाप्रकारची भुयारे बांधण्याचा प्रयत्न केला होता.

Updated: Apr 25, 2019, 07:21 PM IST
दारुगोळा साठवण्यासाठी भारतीय लष्कराकडून सीमारेषेवर विशेष भुयारांची उभारणी title=

नवी दिल्ली: पाकिस्तान आणि चीनच्या सीमारेषेवरील तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कराने एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता भारतीय लष्कराकडून या दोन्ही देशांच्या सीमारेषेनजीक विशेष भुयारे तयार करण्यात येणार आहे. या भुयारांमध्ये तयार करण्यात येणाऱ्या गोदांमामध्ये तब्बल दोन लाख किलो दारुगोळा साठवता येईल. जेणेकरून युद्धाचा प्रसंग आल्यास भारतीय लष्कराला शत्रूला लवकरात लवकर चोख प्रत्युत्तर दिले जाईल. येत्या दोन वर्षांत ही चार विशेष भुयारे बांधली जातील. या भुयारांचे वैशिष्ट्य म्हणजे ती कोणत्याही हल्ल्यापासून सुरक्षित राहतील. 

यासाठी भारतीय लष्कर आणि एनएचपी यांच्यात सामंजस्य करार झाला आहे. त्यानुसार दोन वर्षांच्या कालावधीत ही चार भुयारे बांधली जातील. त्यासाठी जवळपास १५ कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. या प्रत्येक भुयारात दोन लाख किलो दारुगोळा साठवण्याची क्षमता असेल. यापैकी तीन भुयारे चीन आणि पाकिस्तानच्या सीमारेषेनजीक असतील. 

भारतीय लष्कराने यापूर्वी अशाप्रकारची भुयारे बांधण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यामध्ये अपयश आले होते. त्यामुळे आता लष्कराने एनएचपीसीची मदत घ्यायचे ठरवले आहे. एनएचपीसीला दुर्गम अशा डोंगराळ भागात अनेक वीज प्रकल्प उभारण्याचा अनुभव आहे. यासाठी एनएचपीसीकडून अनेक मोठी भुयारे तयार करण्यात आली आहेत. 

सध्याच्या घडीला अमेरिका आणि चीनकडे शस्त्रास्त्रांच्या साठ्यासाठी अशाप्रकारची भुयारे आहेत. युद्धाच्यावेळी शत्रू राष्ट्राकडून सर्वप्रथम दारुगोळ्याच्या कोठारांना लक्ष्य केले जाते. मात्र, हाच शस्त्रसाठा भुयारांमध्ये ठेवल्यास अधिक सुरक्षित असेल. भारतीय वायूदलाने नुकत्याच बालाकोटमध्ये केलेल्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्ताने विमाने भारतीय हद्दीत घुसली होती. यावेळी त्यांच्याकडून लष्करी ठिकाणांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न झाला होता. त्यामुळे भारतीय लष्कराकडून भूमिगत कोठारांच्या निर्मितीला गती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.