वाराणसीत नरेंद्र मोदींचा भव्यदिव्य रोड शो; रस्त्याच्या दुतर्फा लोकांची मोठी गर्दी

मोदी उद्या आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील.

Updated: Apr 25, 2019, 06:33 PM IST
वाराणसीत नरेंद्र मोदींचा भव्यदिव्य रोड शो; रस्त्याच्या दुतर्फा लोकांची मोठी गर्दी title=

वाराणसी: लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी गुरुवारी वाराणसीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून भव्य असा रोड शो करण्यात येत आहे. बनारस हिंदू विद्यापीठाबाहेरल पंडित मदन मोहन मालवीय यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून नरेंद्र मोदी यांनी रोड शो ची सुरुवात केली. यानंतर तब्बल सहा किलोमीटरचे अंतर पार करून दशाश्वमेध घाटाजवळ या रोड शो ची सांगता होईल. या 'रोड शो'च्या निमित्ताने वाराणसीत भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे. या सगळ्यांकडून मोदीनामाचा गजर केला जात आहे. नरेंद्र मोदी यंदाही वाराणसीतून निवडणूक लढवणार आहेत. त्यासाठी मोदी उद्या आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील. या पार्श्वभूमीवर आज मोदींकडून या रोड शोच्या माध्यमातून जोरदार शक्तीप्रदर्शन केले जात आहे. रोड शो'नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी दशाश्वमेद घाटावर गंगा आरतीत सहभागी होणार आहेत. गंगा आरतीनंतर मोदी काशी विश्वनाथाचे दर्शन करणार आहेत.  

यानंतर रात्री आठ वाजण्याच्या सुमारास हॉटेल डी पेरिस येथे मोदी काही महत्त्वाच्या व्यक्तींच्या गाठीभेटी घेतील. शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजता मोदी बूथ प्रमुख आणि पक्ष कार्यकर्त्यांनी संबोधित करतील. सकाळी ११ वाजता मंदिरात जाऊन पूजा करतील आणि त्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी रवाना होतील. यावेळी मोदींसोबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि जदयू अध्यक्ष नितीश कुमार यांच्यासह एनडीए आघाडीतील अनेक महत्त्वाचे नेतेही उपस्थित असतील.