हाफिज सईदच्या सुटकेवर भारताची तीव्र नाराजी

मुंबई दहशतवादी हल्ल्याचा प्रमुख सूत्रधार आणि कुख्यात दहशतवादी हाफिज सईद याच्या सुटकेवर भारतानं तीव्र नाराजी व्यक्त केलीय.

Updated: Nov 24, 2017, 09:02 AM IST
हाफिज सईदच्या सुटकेवर भारताची तीव्र नाराजी title=

नवी दिल्ली : मुंबई दहशतवादी हल्ल्याचा प्रमुख सूत्रधार आणि कुख्यात दहशतवादी हाफिज सईद याच्या सुटकेवर भारतानं तीव्र नाराजी व्यक्त केलीय. हाफिज सईदची नजरकैदेतून मुक्तता करण्याचा निर्णय पाकिस्तान सरकारनं घेतलाय. 

मात्र पाकिस्तान सरकारची ही भूमिका दहशतवाद्यांना पाठीशी घालणारी आहे, अशा शब्दांत केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयानं नापसंती व्यक्त केलीय. संयुक्त राष्ट्रसंघानं बंदी घातलेल्या सईदसारख्या दहशतवाद्याला मोकाट सोडणं योग्य नाही, असंही परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी सुनावलं. 

कुलभूषण जाधवच्या कुटुंबियांना संरक्षण

दरम्यान, मृत्यूदंडाची शिक्षा झालेल्या आणि पाकिस्तानी तुरुंगात असलेल्या कुलभूषण जाधवच्या आईला आणि पत्नीला संरक्षण पुरवावं, अशी मागणी भारतानं पाकिस्तानकडं केलीय. त्या दोघी पाकिस्तानात गेल्यास त्यांना कोणतेही प्रश्न विचारू नयेत किंवा त्यांची चौकशी करू नये, असंही पाकिस्तानाला सांगण्यात आलंय.

पाकचा ना'पाक' चेहरा समोर

भारतानेही हाफिज सईद याच्या दहशतवादी कृत्याबाबत सबळ पुरावे दिले होते. मात्र, तरीही हाफीज सईद मोकाट सुटल्याने पाकिस्तान सरकारचा ना'पाक' चेहरा समोर आला आहे.

जानेवारी २०१७मध्ये नजरकैदेत

दहशतवादाविरोधात कठोर आणि आक्रमक भूमिका घेण्याचा निर्णय घेत अमेरिकेने जमात- उद- दवाविरोधात कारवाई न झाल्यास निर्बंध लादले जातील, असं पाकिस्तानला ठणकावून सांगितलं होतं. त्यानंतर जानेवारी २०१७ मध्ये हाफिझ सईद आणि त्याच्या साथीदारांना नजर कैदेत ठेवण्यात आलं होतं.