CJI DY Chandrachud : देशाचे 50वे सरन्यायाधीश न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड हे नेहमीच देशात घडणाऱ्या घटनांवर, न्यायालयीन कामकाजासह विविध विषयांवर भाष्य करत असतात. महत्त्वाच्या प्रकरणांवर सुनावण्या करत असताना न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड हे टीका देखील करत असतात. अशातच आता न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी आणखी एक महत्त्वाचं विधान केलं आहे हे सध्या चर्चेत आहे. मी काही जादूगार नाही जो देशातील किंवा देशभरातील न्यायालयांचे सर्व प्रश्न सोडवू शकतो, असे न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड म्हणाले आहेत. पण त्यांनी असं विधआन का केलं याबाबत आता चर्चा सुरु झाल्या आहेत.
सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारल्यापासून न्यायालयातील जुन्या समस्या सोडवण्याची प्रक्रिया प्रत्यक्षात सुरू केल्याचे न्यायमूर्ती डी वाय चंद्रजूड यांनी म्हटलं आहे. इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत चंद्रचूड यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. "ज्या दिवशी मी भारताचे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली, त्या दिवशी मी न्यायालयाच्या सदस्यांना आणि अगदी याचिकाकर्त्यांनाही सांगितले की मी जादूगार नाही जो मी माझ्या किंवा देशाच्या सर्व समस्या एका क्षणात सोडवू शकेन, असे न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड म्हणाले.
"न्यायालयांवर परिणाम करणाऱ्या दीर्घकालीन समस्यांचे निराकरण करण्यासाठी आवश्यक पावले उचलण्याची माझी स्पष्ट योजना होती. म्हणून, मी पहिली गोष्ट केली ती म्हणजे खंडपीठावरील माझ्या सहकाऱ्यांचा सल्ला घेणे आणि त्यांचा दृष्टिकोन जाणून घेणे. न्यायव्यवस्थेवर परिणाम करणाऱ्या समस्यां सोडवण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यासाठी मी न्यायिक अधिकारी, अभ्यासक आणि संशोधकांची एक टीम देखील तयार केली आहे. न्यायालयीन पायाभूत सुविधा सुधारणे, केवळ न्यायाधीशांच्याच नव्हे तर न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या क्षमता वाढवणे आणि न्यायालयातील खटले प्रलंबित राहण्याचे प्रमाण कमी करणे हे या चर्चेतून समोर आले होते," असेही न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड म्हणाले.
"प्रलंबित असलेल्या प्रकरणांमध्ये कोणतीही वाढ होणार नाही याची आम्ही खात्री घेत आहोत. या संदर्भात आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही पूर्ण होणाऱ्या प्रकरणांची संख्या वाढवली आहे आणि महत्त्वाच्या घटनात्मक खटले सोडवले आहेत. आम्ही हे नक्की केले आहे की किमान एक घटनापीठ सतत सुरु राहील. असे केल्याने आम्ही अनेक वर्षे आणि दशकांपासून प्रलंबित अनेक घटनात्मक प्रकरणे निकाली काढली आहेत आणि भविष्यातही हेच सुरूच राहणार आहे," असेही न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी स्पष्ट केले