ओवैसींचा फोटो झाला व्हायरल, पाहा पुढे काय घडले?

वेगवेगळी वादग्रस्त ठरू शकणारी वक्तव्ये करून कायम प्रसिद्धीच्या झोतात येणारे एआयएमआयएमचे नेते खासदार असदुद्दिन ओवैसी यावेळी वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहेत.

Updated: Jan 30, 2019, 10:00 AM IST
ओवैसींचा फोटो झाला व्हायरल, पाहा पुढे काय घडले? title=

हैदराबाद - वेगवेगळी वादग्रस्त ठरू शकणारी वक्तव्ये करून कायम प्रसिद्धीच्या झोतात येणारे एआयएमआयएमचे नेते खासदार असदुद्दिन ओवैसी यावेळी वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहेत. ओवैसी यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला आहे. त्यावरून त्यांच्यावर काहीजणांकडून टीका करण्यात येते आहे. ओवैसी हेल्मेट न घालता हैदराबादमधील रस्त्यांवरून बुलेटवरून फिरले. यावेळी त्यांच्या मागे एक आयएएस अधिकारी बसले होते. त्यांच्याही डोक्यावर हेल्मेट नव्हते. दोघेही हेल्मेट न घालता बुलेटवरून हैदराबादमध्ये फिरल्यामुळे त्यांच्यावर टीका करण्यात येते आहे.

हा फोटो कोणत्यावेळी घेण्यात आला, याची निश्चित माहिती नाही. पण तो गेल्या आठवड्यातील असावा, अशी माहिती मिळाली आहे. फोटोमध्ये ओवैसी आणि त्यांच्या मागे आयएएस अधिकारी अरविंद कुमार बुलेटवरून जाताना दिसतात. या बुलेटचा क्रमांकही सोशल मीडियामध्ये वेगाने फिरतो आहे. AP 12 L 4000 असा बुलेटचा क्रमांक आहे. बुलेट कोणाची आहे, याचीही माहिती समजलेली नाही. पण ओवैसी स्वतः खासदार आहेत. त्याचबरोबर अरविंद कुमार हे आयएएस अधिकारी आहेत. असे असतानाही त्यांनी अशा प्रकारे नियम मोडल्यामुळे त्यांच्यावर टीका करण्यात येते आहे.

दरम्यान, अरविंद कुमार यांनी एक ट्विट करून हेल्मेट न घालता बुलेटवर बसल्याबद्दल आपण तेलंगणा वाहतूक शाखेच्या पोलिसांकडे १३५ रुपयांचा दंड भरला असल्याचे म्हटले आहे. ऑनलाईन माध्यमातून मी हा दंड पोलिसांकडे भरला आहे, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. त्याचबरोबर दंडाच्या पावतीचा फोटोही त्यांनी ट्विटमध्ये वापरला आहे. २५ जानेवारी २०१९ रोजी विना हेल्मेट दुचाकीवर बसल्याबद्दल मी हा दंड भरल्याचे त्यांनी लिहिले आहे.