नोकरीत एकही सुटी न घेतल्याबद्दल निवृत्तीवेळी मिळाले २१ कोटी!

नोकरीतून निवृत्त होताना अनिल मणिभाई नायक यांना मिळणारी एकूण रक्कम १३७ कोटींहून जास्त होती.

Updated: Jan 30, 2019, 09:14 AM IST
नोकरीत एकही सुटी न घेतल्याबद्दल निवृत्तीवेळी मिळाले २१ कोटी! title=

नवी दिल्ली - सुटी किंवा रजा हा कायमच कर्मचाऱ्यांमध्ये चर्चेचा विषय असतो. काहीजण तर केवळ भरपूर सुट्या मिळतात म्हणून एखादी नोकरी करतात की काय असा प्रश्नही अनेकांना पडतो. पण नोकरीमध्ये सुटी किंवा रजाच न घेतलेल्या माणसांचीही चर्चा होऊ शकते, याचे नुकतेच एक उदाहरण समोर आले आहे. एका खासगी कंपनीमध्ये वरिष्ठ व्यवस्थापनात कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्याने नोकरीमध्ये एकही सुटी घेतली नाही. त्याबदल्यात त्याने निवृत्तीवेळी तब्बल २१ कोटी रुपये कमावले आहेत. आता हा विषय सोशल मीडियामध्ये चर्चेचा होऊ लागला आहे. 

लार्सन ऍंड टुब्रो कंपनीमध्ये अकार्यकारी अध्यक्ष पदावरून अनिल मणिभाई नायक नुकतेच निवृत्त झाले. आपल्या नोकरीच्या कार्यकाळात त्यांनी आजारपणाची किंवा इतर कोणतीही सुटी घेतली नाही. काही दिवसांपूर्वीच ते सेवानिवृत्त झाल्यावर कंपनीकडून त्यांना यासाठी २१ कोटी रुपये मिळाले. नुकताच केंद्र सरकारकडून अनिल मणिभाई नायक यांना देशातील मानाचा नागरी सन्मान पद्मविभूषण जाहीर झाला आहे. लार्सन ऍंड टुब्रो या कंपनीला यशाच्या शिखरावर घेऊन जाण्यात अनिल मणिभाई नायक यांची महत्त्वाची भूमिका होती. या निमित्तच त्यांचा मोठ्या पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे. 

१९६५ मध्ये अभियंता म्हणून अनिल मणिभाई नायक यांनी लार्सन ऍंड टुब्रो कंपनीमध्ये काम करण्यास सुरुवात केली होती. यापूर्वी त्यांना २००९ मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. लार्सन ऍंड टुब्रोच्या २०१७-१८ मधील वार्षिक आर्थिक अहवालात अनिल मणिभाई नायक यांना रजा न घेतल्याच्या बदल्यात २१.३३ कोटी रुपये देण्यात आल्याचा उल्लेख आहे. नोकरीतून निवृत्त होताना अनिल मणिभाई नायक यांना मिळणारी एकूण रक्कम १३७ कोटींहून जास्त होती. ज्यामध्ये २.७ कोटी रुपयांचे केवळ मूळ वेतन आहे. ग्रॅच्युटी आणि इतर भत्ते हेच १०० कोटींहून अधिक आहेत. अनिल मणिभाई नायक हे गावातील एका प्राथमिक शिक्षकाचे सुपूत्र आहेत.

Tags: