एन.डी. तिवारींचे निधन आणि विचित्र योगायोग

निधनापूर्वी काही तास आधीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल

Updated: Oct 18, 2018, 05:52 PM IST
एन.डी. तिवारींचे निधन आणि विचित्र योगायोग title=

नवी दिल्ली: आंध्र प्रदेशचे माजी राज्यपाल, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण दत्त तिवारी यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. गेल्या महिन्यात पक्षाघाताचा झटका आल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेव्हापासून तिवारी यांची प्रकृती चिंताजनक होती. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. 

मात्र, तिवारी यांच्या मृत्यूनंतर एक योगायोग समोर आला आहे. एन. डी. तिवारी यांचा आज वाढदिवस होता. त्यांचा निधनापूर्वी काही तास आधीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोत त्यांचा मुलगा रोहित शेखर त्यांना वाढदिवसाचा केक भरवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. त्यामुळे हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

तिवारी यांचा जन्म नैनितालमधील बलौटी गावात १९२५ साली झाला होता. महाविद्यालयात शिक्षण घेत असतानाच ते काँग्रेसशी संबंधित विद्यार्थी संघटनेत सामील झाले. शिक्षण पूर्ण झाल्यावर ते राजकारणात उतरले. उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या दोन्ही राज्यांचे मुख्यमंत्रीपद भूषवण्याचे दुर्मिळ योगायोगही त्यांच्या नशिबी आला.