अहमदाबाद : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी शनिवारी एका कार्यक्रमात बोलताना म्हटलं की, हिंदू समाजाच्या श्रद्धा केंद्रांचा अनेक वर्षांपासून अपमान करण्यात आला. 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेवर येईपर्यंत कोणीही त्यांचा अभिमान पुनर्संचयित करण्याची पर्वा केली नाही. मोदी सरकार आता अशा स्थळांच्या नूतनीकरणासाठी 'निर्भयपणे' काम करत आहे. पूर्वी लोक मंदिरात जाण्यास टाळाटाळ करत होते, परंतु मोदी सरकारमुळे नवीन युग सुरू झाले.'
अमित शाह अहमदाबादमधील कडवा पाटीदार पंथाची देवी 'माँ उमिया' यांना समर्पित उमियाधाम मंदिराच्या पायाभरणी समारंभात बोलत होते. 1500 कोटी रुपये खर्चून 74 हजार चौरस यार्ड जागेवर हे मंदिर आणि इतर इमारती बांधल्या जात आहेत. या मेळाव्याला संबोधित करताना ते म्हणाले, "अनेक वर्षांपासून हिंदू समाजाच्या श्रद्धेच्या केंद्रांचा अपमान करण्यात आला आणि केंद्रात मोदी सरकार पूर्ण बहुमताने सत्तेवर येईपर्यंत कोणीही पुढाकार घेतला नाही." '
अमित शाह म्हणाले, "आज आर्य समाजी (गुजरातचे राज्यपाल) आचार्य देवव्रत यांच्या हस्ते एका भव्य मंदिराची पायाभरणी होत असताना, अशा प्रसंगी मी सांगू इच्छितो की मोदीजींनी आपल्या केंद्रांच्या जीर्णोद्धारासाठी काम केले आहे. त्यांनी निर्भयपणे, आत्मविश्वासाने आणि आदराने काम केले. ते म्हणाले की, पंतप्रधानांनी आदि शंकराचार्यांच्या प्रतिमेचे अनावरण केले आणि 2013 च्या महापुराने उद्ध्वस्त झालेल्या केदारनाथ मंदिर परिसरात कोट्यवधी हिंदूंच्या श्रद्धा केंद्राचे पुनरुज्जीवन केले.
ते म्हणाले, 'औरंगजेबाच्या काळात उद्ध्वस्त झालेल्या काशी विश्वनाथ मंदिराचा जीर्णोद्धार आपण 13 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्रभाईंच्या हस्ते पाहू. मंदिरे ही केवळ धार्मिक श्रद्धेची केंद्रेच नाहीत, तर ती समाजसेवेची आणि जीवनातून निराश झालेल्या लोकांसाठी त्यांच्या अडचणींवर मात करून पुढे जाण्यासाठी ऊर्जा देणारी केंद्रे आहेत. यावेळी भाजप नेत्याने पाटीदार समाजाचे कौतुक करत गुजरात आणि देशाच्या उन्नतीचा इतिहास या समाजाशी निगडित असल्याचे सांगितले.
कार्यक्रमादरम्यान, तीन दिवसीय पायाभरणी समारंभाच्या पहिल्या दिवशी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, माजी उपमुख्यमंत्री नितीन पटेल, राज्यपाल आचार्य देवव्रत आणि इतरांनी कार्यक्रमात भाग घेतला. तसेच, 13 डिसेंबर रोजी पंतप्रधान मोदी व्हर्च्युअल माध्यमातून पायाभरणी समारंभाला उपस्थित राहणार आहेत.