लग्न मोडलंत आमचं मनोबल नाही! हिंदू तरुण आणि मुस्लीम तरुणी आज पुन्हा विवाहबंधनात अडकणार, पोलिसांना आव्हान

Viral News: केरळमध्ये (Kerala) 21 वर्षीय हिंदू (Hindu) तरुण आणि 18 वर्षीय मुस्लीम (Muslim) तरुणी विवाहबंधनात अडकणार आहे. काही दिवसांपूर्वीच पोलिसांनी त्यांच्या लग्नात विघ्न आणलं होतं. पोलीस तरुणीला लग्नाआधी मंदिरातून खेचून नेत असल्याचा व्हिडीओ (Video) व्हायरल (Viral) झाला होता.   

शिवराज यादव | Updated: Jun 21, 2023, 10:07 AM IST
लग्न मोडलंत आमचं मनोबल नाही! हिंदू तरुण आणि मुस्लीम तरुणी आज पुन्हा विवाहबंधनात अडकणार, पोलिसांना आव्हान title=

Viral News: केरळमध्ये (Kerala) 21 वर्षीय हिंदू (Hindu) तरुण आणि 18 वर्षीय मुस्लीम (Muslim) तरुणी पुन्हा एकदा विवाहबंधनात अडकणार आहे. काही दिवसांपूर्वीच पोलिसांनी त्यांच्या लग्नात विघ्न आणलं होतं. पोलीस तरुणीला लग्नाआधी मंदिरातून खेचून नेत असल्याचा व्हिडीओ (Video) व्हायरल (Viral) झाला होता. 

18 वर्षीय अलफिया आणि 21 वर्षीय अखिल 17 जून रोजी थिरुअनंतपूरम येथे एका मंदिरात लग्न करणार होते. पण त्याचवेळी या लग्नात पोलीस पोहोचले होते. यानंतर पोलिसांनी अलफियाला मंदिरातून अक्षरश: ओढत नेलं होतं. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. अखिल आणि अलफिया या दोघांच्या कुटुंबीयांचा लग्नाला विरोध होता. 

अलफियाच्या कुटुंबाने पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्कार दाखल केली होती. पण 16 जूनला घर सोडणाऱ्या अलफियाने पोलिसांना आपण आपल्या इच्छेने सर्व काही करत असल्याचं सांगत कुटुंबीयांचा दावा फेटाळला होता. 

पोलिसांनी आपली बाजू मांडताना, प्रकरण बंद करण्यासाठी अलफियाला न्यायाधीशांसमोर हजर करावं लागणार असल्याचा अजब तर्क मांडला होता. तसंच अलफिया सहकार्य करत नसल्याने बळाचा वापर करावा लागला होता असंही सांगितलं होतं. 

पोलिसांच्या कारवाईवर अलफियाने केलं होतं भाष्य

पोलिसांनी जबरदस्ती नेल्यानंतर अलफियाने त्यावर भाष्य केलं होतं. पोलिसांनी आपल्या इच्छेविरोधात तेथून नेलं  होतं. आपण स्वत:हून अखिलकडे गेलो होतो असा खुलासा तिने केला होता. तिने एका चॅनेलला सांगितलं होतं की "मी शुक्रवारी अखिलसह आले होते. कुटुंबाने याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. मी पोलिसांनी लिखित स्टेटमेंट देल आपण अखिलसह जात असल्याचं सांगितलं होतं. यानंतर मी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली. मी अखिलसह जाऊ नये यासाठी त्यांनी ही तक्रार दाखल केली होती," असा आरोप अलफियाने केला होता.

पोलिसांनी फार चुकीच्या पद्धतीने कारवाई केली होती. त्यांनी मला ढकललं आणि वाईट वागणूक दिली. मी कुटुंबाला सोडून आले होते. हे असं करण्याची काही गरज नव्हती. आम्ही एक वर्षांपासून एकमेकांना ओळखत आहोत. आता आम्ही पुन्हा लग्न करणार आहोत असं तिने सांगितलं. 

नेमकं काय झालं होतं?

अलफियाच्या कुटुंबाने मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केल्यानंतर कयामकुलम पोलीस तपास करण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी अलफियाला लग्नाच्या ठिकाणाहून जबरदस्ती नेलं होतं. दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास हा सगळा प्रकार घडला होता. मंदिराबाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटाच तैनात करण्यात आला होता. मुलाच्या वडिलांनीही पोलिसांत तक्रार दिली होती. अखेर दंडाधिकाऱ्यांसमोर हजर केल्यानंतर मुलीला सोडून देण्यात आलं होतं. यानंतर दोघे पुन्हा एकदा एकत्र आले असून विवाहबंधनात अडकणार आहेत.