सर्वाधिक मानधन घेणारे बँकर; वेतन १८ कोटींहून अधिक

गेल्या वर्षात याचं वेतन आणि इतर लाभ 38 टक्क्यांनी वाढून 18.92 कोटी रुपयांवर पोहचलं. 

Updated: Jul 20, 2020, 05:26 PM IST
सर्वाधिक मानधन घेणारे बँकर; वेतन १८ कोटींहून अधिक title=
संग्रहित फोटो

नवी दिल्ली : खाजगी क्षेत्रातील एचडीएफसी बँकचे (HDFC Bank) व्यवस्थापकीय संचालक आदित्य पुरी 2019-20 या गेल्या आर्थिक वर्षातील सर्वाधिक मानधन घेणारे बॅंकर ठरले आहेत. गेल्या वर्षात पुरी याचं वेतन आणि इतर लाभ 38 टक्क्यांनी वाढून 18.92 कोटी रुपयांवर पोहचलं. मालमत्तेच्या बाबतीत एचडीएफसी बँकेला सर्वात मोठी खासगी क्षेत्रातील बँक बनवण्याचं श्रेय पुरी यांना जातं.

एचडीएफसी बँकेच्या वार्षिक रिपोर्टनुसार, गेल्या आर्थिक वर्षात पुरी यांना शेअर्सचा वापर करण्यासाठी अतिरिक्त 161.56 कोटी रुपये मिळाले. पुरी यावर्षी ऑक्टोबरमध्ये वयाची 70 वर्षे पूर्ण केल्यानंतर निवृत्त होणार आहेत. 2018-19 वर्षात शेअर पर्यायाच्या रुपात 42.40 कोटी रुपये मिळाले होते. 

पुरी यांचे उत्तराधिकारी म्हणून एचडीएफसी समूह प्रमुख आणि 'चेंज एजंट' शशिधर जगदीशन यांच्या नावाचा समावेश आहे. अहवालानुसार, जगदीशन यांना मागील आर्थिक वर्षात 2.91 कोटी रुपये वेतन मिळालं होतं.

देशातील खाजगी क्षेत्रातील दुसर्‍या क्रमांकाची बँक असणाऱ्या आयसीआयसीआय बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप बक्षी यांना पहिल्या वर्षात 6.31 कोटी रुपये वेतन आणि इतर लाभ मिळाले. बँकेच्या वार्षिक अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.

एक्सिस बँकेच्या वार्षिक अहवालानुसार, बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अमिताभ चौधरी यांना 2019-20 मध्ये एकूण 6.01 कोटी रुपये मानधन मिळालं होतं. 2018-19च्या शेवटच्या तिमाहीमध्ये त्यांना 1.27 कोटी रुपये वेतन-भत्ता मिळालं होतं.

कोटक महिंद्रा बँकचे व्यवस्थापकीय संचालक उदय कोटक यांच्या वेतनात गेल्या वर्षी घसरण झाली. त्यांच्याकडे बँकेची 26 टक्के भागीदारीही आहे. बँकेच्या वार्षिक अहवालानुसार, गेल्या वर्षात कोटक यांचं एकूण वेतन 2.97 कोटी रुपये इतकं होतं.