अजब! खड्ड्याने वाचवला जीव, रुग्णवाहिका खड्ड्यातून जाताच मृत व्यक्ती झाली जिवंत

रस्त्यांवरील खड्ड्यामुळे अनेकदा जीवघेण्या अपघाताच्या घटना समोर आल्या आहेत. मात्र हरियाणाच्या कर्नालमध्ये रस्त्यावरील खड्ड्यामुळे एका वृद्ध व्यक्तीचा जीव वाचल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

आकाश नेटके | Updated: Jan 13, 2024, 01:09 PM IST
अजब! खड्ड्याने वाचवला जीव, रुग्णवाहिका खड्ड्यातून जाताच मृत व्यक्ती झाली जिवंत title=

Shocking News : अनेकवेळा रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहनचालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. सामान्यत: रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे लोक जखमी होतात. कधी कधी हे खड्डे जीवघेणेही ठरतात. पण रस्त्यावरील खड्ड्यांमुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीमध्ये प्राण परत येतो तेव्हा काय होते? तुम्ही यावर विश्वास ठेवणार नाही, पण असं प्रत्यक्षात घडलं आहे. खड्ड्यामुळे एका मृत व्यक्तीचा श्वास पुन्हा चालू झाला. या सगळ्या प्रकारामुळे अनेकांना धक्का बसला असून याबाबत लोक आश्चर्य व्यक्त करत आहेत.

हरियाणातील कर्नालमध्ये हा चमत्कार घडला आहे. रस्त्यावरील खड्ड्यामुळे 80 वर्षीय मृत व्यक्ती जिवंत झाल्याचे म्हटलं जात आहे. मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांनी हा खळबळजनक दावा केला आहे. रुग्णालयात डॉक्टरांनी या 80 वर्षीय व्यक्तीला मृत घोषित केले होते. अंत्यसंस्कारासाठी कुटुंबीय त्यांना रुग्णवाहिकेतून घरी घेऊन जात असताना एका मोठ्या खड्ड्यात रुग्णवाहिका अडकली. या जोरदार धक्क्यामुळे मृत व्यक्तीच्या शरीराची अचानक सुरु झाली. त्यानंतर नातेवाईकांनी त्या वृद्धाला पुन्हा रुग्णालयात नेले. आता त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

नेमकं काय घडलं?

हरियाणातील पटियाला येथील रुग्णालयात डॉक्टरांनी दर्शन सिंग ब्रार यांना मृत घोषित केले होते. ब्रार यांच्यावर त्यांच्या मूळ गावी निसिंग येथे अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय कुटुंबियांनी घेतला होता. त्यामुळे ब्रार यांचा नातू त्याच्या मृत आजोबांच्या मृतदेहासह रुग्णवाहिकेतून निघाला होता. पटियालाहून कर्नालला जात असताना रस्त्यावरील एका खड्डामुळे रुग्णवाहिका जोरात आदळली. यानंतर आजोबांचा हात थरथरत असल्याचे नातवाने पाहिले. त्याने लगेचच ब्रार यांना रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी तीन तासांपूर्वीच ब्रार यांना मृत घोषित केले होते. मात्र नातवाने त्यांना पुन्हा रुग्णालयात आणलं तेव्हा डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली आणि ब्रार यांना जिवंत घोषित केले.

ब्रार यांच्या नातवाने दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे संपूर्ण कुटुंब कर्नाल येथे राहते. गेल्या काही दिवसांपासून आजोबांची तब्येत खराब होती. त्यांना आधी कर्नाल येथील नर्सिंग होममध्ये दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना कर्नाल येथील रुग्णालयात नेण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून ते व्हेंटिलेटरवर होते. गुरुवारी सकाळी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. यानंतर सर्व नातेवाईकांना याची माहिती देण्यात आली. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी सर्वजण घरीही आले होते.

दरम्यान, आता ब्रार यांच्यावर कर्नाल येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्रार यांची प्रकृती सध्या चिंताजनक आहे. दुसरीकडे हा आमच्यासाठी चमत्कार असल्याचे कुटुंबीयांनी म्हटलं आहे. ब्रार यांच्या निधनाचे वृत्त समजताच संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली होती. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी कुटुंबियांनी तयारी सुरु केली होती. मात्र, अचानक रुग्णवाहिका खड्ड्यात आदळल्याने ब्रार यांच्या शरीरात पुन्हा हालचाल सुरु झाली.