'इतकंही असंवेदनशील वागू नका', संतापलेल्या हर्षा भोगलेंना Indigo ने दिलं उत्तर, म्हणाले 'तुम्ही आमचं....'

क्रिकेट समालोचक हर्षा भोगले (Harsha Bhogle) यांनी वयस्कर दांपत्याची सीट बदलल्याने इंडिगोला (Indigo) खडेबोल सुनावले आहेत. चौथ्या रांगेतील सीट असतानाही कोणतंही स्पष्टीकरण न देता 19 नंबरची सीट दिल्याने त्यांनी संताप व्यक्त केला.     

शिवराज यादव | Updated: Aug 25, 2024, 02:47 PM IST
'इतकंही असंवेदनशील वागू नका', संतापलेल्या हर्षा भोगलेंना Indigo ने दिलं उत्तर, म्हणाले 'तुम्ही आमचं....' title=

क्रिकेट समालोचक हर्षा भोगले (Harsha Bhogle) यांनी विमान प्रवासात वयस्कर दांपत्याची सीट बदलल्याने इंडिगोला (Indigo) खडेबोल सुनावले आहेत. एक्सवर त्यांनी पोस्ट शेअर करत आपला संताप व्यक्त केला आहे. त्यांना दावा केला आहे की, वयस्कर दांपत्याने आपल्याला जास्त चालावं लागू नये यासाठी चौथ्या रांगेतील सीट बूक केली होती. पण विमान कंपनीने कोणतंही स्पष्टीकरण न देता त्यांना 19 व्या रांगेतील सीट दिली असा आरोप त्यांनी केल आहे. "त्यांना इतक्याशा जागेतून 19 व्या रांगेपर्यंत चालताना त्रास होत होता. पण कोण काळजी करतंय," अशी खंतही त्यांनी मांडली आहे. अखेर काहींनी या अनैतिकतेकडे बोट दाखवल्यानंतर त्यांना त्यांच्या मूळ सीटवर बसू दिलं असंही त्यांनी सांगितलं आहे.

पोस्टमध्ये काय लिहिलं आहे?

"#IndigoFirstPassengerLast चं आणखी एक उदाहरम. मी प्रवास करत असलेल्या विमानातील एका वयस्कर जोडप्याने जास्त चालावं लागू नये यासाठी चौथ्या रांगेतील सीटसाठी पैसे दिले होते. पण कोणतंही स्पष्टीकरण न दे त्यांची सीट बदलण्यात आली. इतक्या छोट्या जागेत चालत 19 व्या रांगेपर्यंत पोहोचताना त्यांना त्रास होणार होता. पण कोण काळजी करतंय. काही लोकांना या अनैतिकतेविरोधात आवाज उठवावा लागला. यानंतर सुदैवाने त्यांना त्यांच्या मूळ सूट देण्यात आल्या," असं हर्षा भोगले यांनी सांगितलं आहे.

पुढे ते म्हणाले की, "प्रवाशांनी जर विरोध केला नसता तर त्यांनी 19 व्या रांगेपर्यंत चालावं लागलं असतं आणि बोर्डिंग पूर्ण झाल्यावर चेक केलं असतं की त्यांना चौथ्या रांगेतील सीट देऊ शकतो का. म्हणजे त्यांना पुन्हा तेवढं चालावं लागलं असतं. त्या वृद्ध महिला नम्रपणे तक्रार करत होत्या की, ही एक सामान्य घटना आहे आणि त्यांच्या वयाच्या लोकांसाठी प्रवास करणे किती तणावपूर्ण आहे. ही मोनोपोली नसावी आपली इच्छा आहे असंही त्या म्हणाल्या".

"खूप खेदाची गोष्ट आहे. मला खात्री आहे की इंडिगो, तुम्ही तुमच्या ग्राउंड स्टाफला प्रवाशांना प्रथम स्थान देण्यासाठी संवेदनशील करू शकता. ते वृद्ध प्रवाशांना किती सहजतेने एका जागेवरुन दुसरीकडे हलवत आहेत हे पाहून खूप निराशा झाली. यशाबरोबर जबाबदारी येते. यशस्वी झाल्याचा अभिमान बाळगणारी कंपनी म्हणून तुम्ही अधिक संवेदनशील व्हाल आणि या बेफिकीर वृत्तीला संस्थात्मक बनवू नका अशी आशा आहे," असं ते पुढे म्हणाले.

हर्षा भोगले यांच्या पोस्टची इंडिगोने दखल घेत खंत व्यक्त केली. "माननीय, भोगले, आमच्या लक्षात आणून दिल्याबद्दल आणि आमच्याशी बोलण्यासाठी वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. ग्राहकांची गैरसोय झाल्यामुळे झालेल्या गोंधळाबद्दल आम्ही मनापासून दिलगीर आहोत. आमच्या कर्मचाऱ्यांनी त्वरीत हस्तक्षेप केला आणि त्यांना त्यांच्या मूळ नियुक्त केलेल्या जागांवर सहजपणे पोहोचता येईल याची खात्री केली." असं कंपनीने सांगितलं.

आपण संबंधित प्रवाशांसोबतही यासंदर्भात संवाद साधल्याचं इंडिगोने सांगितलं आहे. "तुम्ही दाखवलेल्या समजूतदारपणाची आम्ही प्रशंसा करतो आणि लवकरच तुमची सेवा करण्यास उत्सुक आहोत," असंही ते म्हणाले आहेत.