SBI च्या ग्राहकांना हॅकर्सकडून गंडा...तुम्हीही क्रेडिट कार्ड वापरताय?

SBI ग्राहकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी 

Updated: Mar 3, 2021, 01:46 PM IST
SBI च्या ग्राहकांना हॅकर्सकडून गंडा...तुम्हीही क्रेडिट कार्ड वापरताय?   title=

मुंबई : बरेच जण क्रेडिट कार्ड (Credit Card) वापरून त्यावर पॉइंट्स जमवत असतात, आणि नंतर ते पॉइंट्स रोखीत बदलून घेतात, मात्र हेच करताना ग्राहकांची हॅकर्सकडून (Bank Hackers) फसवणूक होत असल्याचं दिसून येतंय. स्टेट बँकेच्या ग्राहकांना क्रेडिट पॉइंट्स (SBI Credit Card)  रोखीत बदलून घेण्याचं आणि त्यातून जवळपास ९ हजार ८७० रूपये मिळवा अशी भूल पाडणारे संदेश पाठवले जात आहेत. मात्र हे मेसेज खोटे असल्याचं निष्पन्न झालंय.

खातेदारांकडून माहिती गोळा करण्यासाठी अशाप्रकारचे बनावट मेसेज पाठवले जात आबेत. नवी दिल्लीतील सायबरपीस फाऊंडेशन आणि ऑटोबोट इन्फोसेस प्रायव्हेट लिमिटेड या संस्थांनी हे प्रकरण समोर आणलं आहे. तुम्ही जर स्टेट बँक ऑफ इंडियाचं क्रेडिट कार्ड वापरत असाल, तर आताच तुमचं खातं आणि क्रेडिट कार्ड पॉईंट्स चेक करून घ्या. आणि हॅकर्सकडून एसबीआयच्या ग्राहकांना गंडा घातला जातोय. 

केवळ क्रेडिट पॉइंट्सच नाही तर या हॅकर्सनी स्टेट बँकेची बोगस वेबसाईटसुद्धा तयार केली आहे. यावर ग्राहकांना वैयक्तिक माहिती देण्यासही सांगितलं जातं. या वेबसाईटची नोंदणीही थर्ड पार्टीने केल्याचं कळतंय. त्यामुळे ही वेबसाईट स्टेट बँक ऑफ इंडियाची नाही हे उघड होतंय. या वेबसाइटचे डोमेन भारतातीलच असून, ते तमिळनाडूमधील असल्याचे ‘सायबरपीस’चे म्हणणे आहे. 

यावर स्टेट बँक ऑफ इंडियानेही स्पष्टीकरण दिलंय. बँक आपल्या ग्राहकांशी कधीही एसएमएस किंवा ई-मेलद्वारे संभाषण करत नाही. शिवाय खातेदारांचे पासवर्डसह कोणतीही वैयक्तिक माहिती अशा माध्यमांद्वारे विचारली जात नाही, असंदेखील बँकेने म्हटलं आहे.  

एकंदरीतच हँकिंगचं प्रकरण समोर आल्यानंतर एसबीआयने आपल्या खातेदारांशी संपर्कही साधायला सुरूवात केली आहे. शिवाय अशाप्रकारे कुणाचं अकाऊंट हॅक झालं असेल, किंवा व्यवहारात छेडछाड झाली असेल, तर तात्काळ सायबर पोलिसांनासुद्धा कळवण्याचं आवाहन केलंय.