डेंग्युच्या उपचारासाठी १६ लाखांचं बिल, केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी घेतली दखल

हरियाणातील गुरूग्राम येथील फोर्टीस हॉस्पिटलने डेंग्युच्या उपचारासाठी १६ लाखांचं बिल दिल्याने एकच चर्चा रंगलीय. मात्र इतका खर्च होऊनही सात वर्षीय आद्या सिंह हिला वाचवण्यात हॉस्पिटलला अपयश आलं.

Updated: Nov 21, 2017, 02:29 PM IST
डेंग्युच्या उपचारासाठी १६ लाखांचं बिल, केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी घेतली दखल title=

हरियाणा : हरियाणातील गुरूग्राम येथील फोर्टीस हॉस्पिटलने डेंग्युच्या उपचारासाठी १६ लाखांचं बिल दिल्याने एकच चर्चा रंगलीय. मात्र इतका खर्च होऊनही सात वर्षीय आद्या सिंह हिला वाचवण्यात हॉस्पिटलला अपयश आलं.

तर दुसरीकडे इतकं बिल कसं झालं यावरून सोशल मीडियावर चर्चा रंगू लागल्याने याची दखल केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी घेतलीय. 

आद्याला डेंग्यू झाल्यानंतर ३१ ऑगस्ट रोजी फोर्टीस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. १ सप्टेंबरला तिला व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आलं. आठवड्यानंतर तिचं एमआरआय करण्याची मागणी तिच्या कुटुंबियांनी केली. मात्र हॉस्पिटल प्रशासनाने तिचं एमआरआय करण्यास मनाई केली. त्यानंतर १४ सप्टेंबरपर्यंत आद्याच्या प्रकृतीत काहीच सुधारणा होत नसल्याचं लक्षात आल्यानंतर त्यांनी एमआरआय करण्याची पुन्हा मागणी केली. 

त्यात आद्याचं ७०-८० टक्के ब्रेन डॅमेज झाल्याचं निष्पन्न झालं. तर दुसरीकडे १५ दिवसांच्या उपचारासाठी १६ लाख रूपयांचं बिल तिच्या कुटुंबियांना देण्यात आलं. १६ लाखांचं बिल पाहून आद्याच्या कुटुंबियांच्या पायाखालची जमिनच सरकरली. त्यात साध्या हँडग्लोवची किंमत २७०० रुपये लावण्यात आली होती. पैशांचा लोभासाठी एमआरआय करण्याचं हॉस्पिटल प्रशासन टाळत होतं, असा आरोप तिच्या वडीलांनी केला. 

हा संपूर्ण प्रकार आद्याच्या वडीलांच्या मित्राने सोशल मीडियावर शेअर केला. याची दखल केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांनी घेतली आणि चौकशीचे आदेश दिले. मात्र हे संपूर्ण आरोप हॉस्पिटल प्रशासनाने फेटाळून लावलेत.