धावत्या स्कूल व्हॅनचा मागचा दरवाजा उघडला आणि... काळजचा थरकाप उडवणारा Video

School Van Incident CCTV : तुमची मुलंही स्कूल व्हॅनने प्रवास करत असतील तर तुम्हाला सावधान करण्यासाठी ही बातमी. धावत्या स्कूल व्हॅनचा दरवाजा उघडून दोन विद्यार्थिनी रस्त्यावर कोसळल्या. काळजाचा थरकाप उडणवाऱ्या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 

राजीव कासले | Updated: Jun 21, 2024, 11:02 PM IST
धावत्या स्कूल व्हॅनचा मागचा दरवाजा उघडला आणि... काळजचा थरकाप उडवणारा Video title=

School Van Incident CCTV : शाळकरी मुलांची वाहतूक करणाऱ्या स्कूल बस आणि स्कूल व्हॅनसाठी (School Van) सरकारने काही नियम आखलेले आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी हे नियम महत्त्वाचे ठरतात. पण यानंतर अनेक स्कूल बस आणि स्कूल व्हॅन चालकांकडून विद्यार्थ्यांना नेताना निष्काळजीपणा दाखवला जातो. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडिआवर व्हायरल (Viral Video) झाला आहे. विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या एका स्कूल व्हॅनचा दरवाजा उघडला आणि दोन विद्यार्थिनी रस्त्यावर पडल्या. काळजाचा थरकाप उडवाणारा हा व्हिडिओ गुजरातमधल्या बडोदा (Vadodara) इथला आहे. 

काय आहे नेमकी घटना?
बडोदामधल्या एका रहिवासी परिसरातील हा व्हिडिओ आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडिओनुसार ही घटना 19 जूनची आहे. या व्हिडिओत एक रहिवासी परिसर दिसत असून एक सफेद रंगाची स्कूल व्हॅन विद्यार्थ्यांना घेऊन त्या रस्त्याने वेगाने जाताना दिसतेय. काही अंतर पुढे गेल्यावर व्हॅनचा दरवाजा अचानक उघडतो आणि दोन विद्यार्थिनी स्कूल बॅगसह धावत्या व्हॅनमधून खाली कोसळतात. पण व्हॅन चालकाला याची भनकसुद्ध लागत नाही. तो त्याच वेगाने व्हॅन पुढे घेऊन जाताना दिसतोय. परिसरातील काही नागरिकांनी आरडाओरडा केल्यानंतर व्हॅन चालकाला दोन विद्यार्थिनी खाली पडल्याचं समजलं.

व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत विद्यार्थिनी खाली पडल्यानंतर त्या व्हिव्हळताना दिसतायत. आसपासची लोकं त्यांच्याजवळ जाऊन त्यांची विचारपूस करतायत. सुदैवाने हा रहिवासी भाग असल्याने रस्त्यावर वाहतूकीची वर्दळ नव्हती. अन्यथा मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती. 

शिक्षण मंत्र्यांनी घेतली दखल
सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर गुजरातचे शिक्षण मंत्री प्रफुल्ल पानशेरिया यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. विद्यार्थ्यांना खासगी स्कूल व्हॅनने पाठवताना पालकांनी त्या व्हॅनमध्ये किती मुलं आहेत, सुरक्षेसाठी काय उपाययोजना केल्या आहेत याची माहिती घ्यावी असं आवाहन शिक्षण मंत्री प्रफुल्ल पानशेरिया यांनी केलं आहे. शिवाय व्हॅन चालक कोण आहे, कुठे राहातो, त्याचं बॅकग्राऊंड काय आहे हे देखील तपासवं असं त्यांनी म्हटलं आहे. विद्यार्थ्यांची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. व्हॅन चालकांनी आपल्यावर किती मुलांची किती मोठी जबाबदारी आहे याचं भान बाळगावं, अस आवाहनही शिक्षण मंत्री प्रफुल्ल पानशेरिया यांनी केलं आहे. 

शाळा प्रशासनाने केली कारवाई
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बडोद्यातल्या ज्या खासगी शाळेतील या विद्यार्थिनी होत्या त्या शाळेने स्कूल व्हॅन चालकावर बंदी घातली आहे. ही घटना बडोद्यातल्या तरसाली रोडवरच्या श्याम सोयाटीतली आहे. इथल्या एका सीसीटीव्हीत ही घटना कैद झालीय. स्कूल व्हॅन चालकाचं नाव प्रतीक परमरा असल्याचं समोर आलं आहे. या घटनेची माहिती पोलिसांनाही देण्यात आलीय.