अहमदाबाद - शाळेमध्ये हजेरी किंवा उपस्थिती हा एक महत्त्वाचा भाग असतो. शाळेत गेल्यावर वर्गशिक्षक उपस्थिती घेतात. त्यावेळी विद्यार्थ्याला त्याचे किंवा तिचे नाव पुकारल्यावर प्रेझेंट सर/मॅडम किंवा येस सर/मॅडम असे म्हणावे लागत होते. पण आता गुजरातमधील शाळांमध्ये उपस्थिती नोंदविण्यासाठी वर्गशिक्षकांनी नाव पुकारल्यावर लगेचच जय हिंद किंवा जय भारत म्हणावे लागणार आहे. तसे म्हणल्यासच विद्यार्थ्याची उपस्थिती लावली जाणार आहे. गुजरात सरकारने राज्यातील सर्व शाळांसाठी एक शासन आदेश काढला असून, त्यामध्ये या बदलाबद्दल माहिती दिली आहे. राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेमाची भावना जोपासली जावी आणि ती वाढावी, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सरकराने म्हटले आहे.
गुजरात राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ आणि प्राथमिक शिक्षण संचालनालयाने हे आदेश जारी केले आहेत. त्यामध्ये इयत्ता १ ते १२ वीच्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी हे आदेश लागू करण्यात आले आहेत. गुजरातमधील अनुदानित आणि विनाअनुदानित दोन्ही प्रकारच्या शाळांसाठी हे आदेश बंधनकारक करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांचे सुरुवातीला प्रबोधन करावे आणि त्यांना आपली उपस्थिती लावण्यासाठी जय हिंद किंवा जय भारत म्हणण्यास सांगावे, असे या आदेश म्हटले आहे.
एक जानेवारी म्हणजे आजपासूनच या आदेशांची अंमलबजावणी करण्यात यावी, असे राज्याचे शिक्षण मंत्री भुपेंद्रसिंह चुडासमा यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत निश्चित करण्यात आले. याबाबत चुडासमा म्हणाले, राजस्थानमधील एका शिक्षकांचा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून नुकताच सत्कार करण्यात आला. त्यावेळी त्यांने आपले मनोगत व्यक्त करताना त्याने उपस्थिती घेताना येस सर किंवा येस मॅडम म्हणण्यापेक्षा विद्यार्थ्यांनी जय हिंद किंवा जय भारत म्हणावे, अशी कल्पना मांडली. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना वाढेल आणि जोपासली जाईल, असेही त्यांनी सांगितले. त्यांचीच ही कल्पना लगेचच गुजरातमध्ये राबविण्याचा निर्णय आम्ही घेतल्याचे भुपेंद्रसिंह चुडासमा यांनी सांगितले.