Bride Groom : प्रत्येक जोडपं आपलं लग्न (marriage) खास व्हावं यासाठी काही ना काही वेगळं करण्याचा प्रयत्न करत असतो. प्रीव्हेडिंग फोटोशूटपासून ते रिसेप्शनपर्यंत पर्यंत प्रत्येक क्षण खास व्हावा असा त्यांचा प्रयत्न असतो. आजकाल तर काही लग्नातील आगळ्यावेगळ्या गोष्टीही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. पण काहीवेळा काहीतरी वेगळं करण्याच्या नादात भलतचं काहीतरी होऊन बसतं. असाच काहीसा प्रकार उत्तर प्रदेशातील संभलमध्ये घडलाय. लग्नाच्या रिसेप्शनमध्ये एका वराने सर्वांसमोर वधूचे चुंबन (Kiss) घेतले. यानंतर रागावलेल्या वधूने थेट पोलीस ठाणे गाठलं आहे.
नेमकं काय झालं?
उत्तर प्रदेशातील संभल येथे एका लग्न समारंभात वराकडून वधूसोबत वारंवार अश्लील कृत्य करण्यात येत होते. त्यामुळे संतापलेल्या वधूने लग्नास नकार दिला आणि थेट पोलिसांत धाव घेतली. रिसेप्शन पार्टीमध्ये या वराने सर्वांसमोर वधूचे चुंबन घेतले. त्यामुळे रागाने लाल झालेल्या वधूने तक्रार देण्यासाठी पोलीस ठाणे गाठले. या दोघांनी 26 नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री सामूहिक विवाह योजना 2022 अंतर्गत लग्न केले होते. यानंतर 28 नोव्हेंबर रोजी पावसा गावात रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दोघेही मंचावर बसलेले असताना वराने सर्वांसमोर हे कृत्य केले.
वराने सर्वांसमोर चुंबन घेतल्यानंतर वधू भडकली आणि ती थेट आपल्या खोलीत निघून गेली. दोन्ही बाजूच्या कुटुंबियांनी तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला पण ती ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. तिने स्टेजवर जाण्यास नकार दिला आणि वरावर कारवाई करण्याची मागणी केली. यानंतर कुटुंबीयांनी वधूला घेऊन बहजोई पोलीस ठाणे गाठले आणि संपूर्ण घटनेची माहिती दिली. यावेळी वराच्या बाजूचे लोकही पोलीस ठाण्यात आले.
मी माझ्या घरी राहीन
यावेळी "मला आता त्याच्यासोबत राहायचे नाही. मी माझ्या घरी राहीन. मला त्याचे वागणे आवडले नाही. जो माणूस 300 लोकांसमोर असे कृत्य करू शकतो, तो कसा सुधारेल? त्यामुळे या कृत्याबद्दल त्याच्यावर कारवाई करावी, असे वधूने सर्वांसमोर म्हटले.
किस करण्याची लागली होती पैज?
मात्र वराने सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. आमच्या दोघांमध्ये पैज लागली होती असे वराने म्हटलं आहे. वधूने पैज लावली होती की, वराने स्टेजवर सर्वांसमोर तिचे चुंबन घेतले तर ती त्याला 1500 रुपये देईल. जर तो तसे करू शकला नाही तर त्याने वधूला 3000 रुपये द्यावे लागतील. पोलिसांनी जेव्हा वधूकडे जेव्हा याबाबत चौकशी केली तेव्हा तिने असं काही ठरलं नव्हतं असे सांगितले.
वेगळं राहण्याचा निर्णय
दोन्ही कुटुंबामध्ये झालेल्या चर्चेनंतर दोघांनीही वेगळं राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या लग्नाची अद्याप नोंदणी झालेली नसल्याने त्यांची इच्छा असेल तर ते घटस्फोटासाठी अर्ज करू शकतात, असे पोलिसांनी सांगितले.