राहुलजी गेट वेल सून; ममतांना पाठिंबा देणाऱ्या राहुल गांधींना भाजपने पकडले कोंडीत

'राहुल गेट वेल सून', अशा मथळ्याखाली भाजपकडून संदेश व्हायरल केला जात आहे.

Updated: Feb 4, 2019, 05:03 PM IST
राहुलजी गेट वेल सून; ममतांना पाठिंबा देणाऱ्या राहुल गांधींना भाजपने पकडले कोंडीत title=

नवी दिल्ली: केंद्र सरकारविरोधात दंड थोपटून उभ्या राहिलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पाठिंबा दर्शविला होता. या मुद्द्यावरून काँग्रेससह विरोधक भाजपविरोधात एकटवले आहेत. मात्र, आता भाजपने जुन्या ट्विटसचा दाखला देत राहुल गांधी यांना कोंडीत पकडले आहे. २०१४ ते २०१६ या काळात राहुल यांनी शारदा चिट गैरव्यवहार प्रकरणात ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केली होती. हा देशातील मोठा घोटाळा असून ममता बॅनर्जी दोषींना पाठिशी घालत असल्याचे राहुल यांनी त्यावेळी म्हटले होते. राहुल गांधी यांची हीच ट्विटस भाजपच्या नेत्यांकडून रिट्विट केली जात आहेत. राहुल गांधी यांच्या या परस्परविरोधी भूमिकेवरून भाजप नेत्यांनी त्यांना लक्ष्य केले आहे. 'राहुल गेट वेल सून', अशा मथळ्याखाली भाजपकडून संदेश व्हायरल केला जात आहे. एवढेच नव्हे तर राहुल गांधी मनोविकार ( मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर) झाला आहे. त्यामुळेच राहुल गांधी यांना काही गोष्टींचा पूर्णत: विसर पडला आहे. त्यामुळे राहुल गांधी यांची प्रकृती लवकर सुधरावी, अशा शुभेच्छा, असे या ट्विटमध्ये म्हटले आहे. या ट्विटसोबत राहुल गांधी यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर केलेल्या ट्विटसची छायाचित्रेही जोडण्यात आली आहेत. 

शारदा चिट फंट गैरव्यवहारप्रकरणाच्या चौकशीसाठी रविवारी केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) विभागाचे पथक पश्चिम बंगालमध्ये आले होते. या पथकाने पश्चिम बंगालचे पोलीस आयुक्त राजीव कुमार यांच्या घरावर छापा टाकला होता. मात्र, राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या कारवाईला आक्षेप घेत सीबीआयच्या अधिकाऱ्यांनाच ताब्यात घेतले होते. तसेच ममता यांनी सीबीआयच्या कार्यालयाबाहेर धरणे आंदोलनही केले होते. ममता आणि केंद्र सरकारमधील या वादामुळे देशभरात मोठी खळबळ उडाली होती. 

 यानंतर राहुल गांधी यांनी ममता बॅनर्जी यांना फोन करून चौकशी केली होती. तसेच काँग्रेस पक्ष खांद्याला खांदा देऊन त्यांच्यासोबत उभा असल्याचे आश्वासनही दिले होते. बंगालमधील घडामोडी म्हणजे घटनात्मक संस्थांवर सातत्याने हल्ला करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचा प्रयत्न आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी केली होती.