'योगी आदित्यनाथ यांचे हेलिकॉप्टर उतरू दिले नाही म्हणून माझ्या मुलावर कारवाई'

पोलीस आयुक्तांच्या आईचे सीबीआयवर गंभीर आरोप

Updated: Feb 4, 2019, 04:39 PM IST
'योगी आदित्यनाथ यांचे हेलिकॉप्टर उतरू दिले नाही म्हणून माझ्या मुलावर कारवाई' title=

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे हेलिकॉप्टर कोलकातामध्ये उतरू न दिल्यामुळेच केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) माझ्या मुलाच्या घरावर छापा टाकून त्याला गोवण्याचा प्रयत्न केला, असा आरोप कोलकाताचे पोलीस आयुक्त राजीव कुमार यांची आई के.डी. गुप्ता यांनी केला. गुप्ता यांनी सोमवारी हे आरोप करून केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. पश्चिम बंगालमध्ये रविवारी रात्री निर्माण झालेल्या अभूतपूर्व परिस्थितीमुळे देशातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. 

शारदा चिटफंड घोटाळ्याप्रकरणी तपासासाठी सीबीआयचे पथक रविवारी कोलकातामध्ये दाखल झाले. त्यानंतर राजीव कुमार यांच्या निवासस्थानी छापा टाकण्यासाठी गेलेल्या पथकाला पश्चिम बंगालमधील पोलिसांनीच ताब्यात घेतले. राजीव कुमार यांच्या निवासस्थानी प्रवेश करण्यास त्यांना नकार देण्यात आला. रात्री उशीरापर्यंत त्यांना पोलिसांनी आपल्या ताब्यात ठेवले होते. त्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले. दुसरीकडे याबद्दल माहिती मिळाल्यावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी धरणे आंदोलन सुरू केले. केंद्र सरकार सीबीआयचा गैरवापर करीत असल्याची टीका त्यांनी केली. विधानसभेचे अधिवेशन सुरू असताना ममता बॅनर्जी यांनी तिथे न जाता सोमवारीही धरणे आंदोलनस्थळीच बैठक मारली. या प्रकरणावरून संसदेमध्येही मोठा गदारोळ झाल्याचे पाहायला मिळाले. तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. तर दुसरीकडे भाजप आणि डाव्या पक्षाच्या खासदारांनी ममता बॅनर्जी यांच्या आडमुठेपणावर आणि तपासात सहकार्य करू न देण्याच्या भूमिकेवर टीका केली. आता गुप्ता यांच्या आरोपामुळे या विषयाला नवे वळण मिळाले.

योगी आदित्यनाथ यांचे हेलिकॉप्टर रविवारी कोलकातामध्ये उतरू न दिल्यामुळेच सीबीआयच्या माध्यमातून त्याच्या निवासस्थानावर छापे टाकण्यात आल्याचे के. डी. गुप्ता यांनी म्हटले आहे. त्यांना या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे गुप्ता यांनी म्हटले आहे.

योगी आदित्यनाथ यांची रविवारी कोलकातामध्ये जाहीर सभा होती. पण पोलिसांनी त्यांचे हेलिकॉप्टरच उतरू न दिल्यामुळे अखेर त्यांनी फोनवरूनच प्रचारसभेला संबोधित केले. दरम्यान, या प्रकरणात चौकशीसाठी सीबीआयने जारी केलेला समन्स रद्द करण्यासाठी पोलीस आयुक्त राजीव कुमार यांनी कोलकाता उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यावर मंगळवारी उच्च न्यायालयात सुनावणी होईल. सीबीआयने या प्रकरणात रविवारी रात्री घडलेल्या प्रकारानंतर सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावरही मंगळवारी सुनावणी होणार आहे.