महात्मा गांधींचा फोटो नोटेवर पहिल्यांदा कधी छापण्यात आला? जाणून घ्या रंजक कहाणी

Mahatma Gandhi’s Portrait On Indian Banknotes: सर्वात आधी महात्मा गांधींच्या या फोटोसह 10 आणि 100 रुपयांच्या नोटा जारी करण्यात आल्या. यानंतर मार्च 1997 मध्ये 50 रुपयांच्या आणि ऑक्टोबर 1997 मध्ये 500 रुपयांच्या नोटा जारी करण्यात आल्या.

Pravin Dabholkar | Updated: Oct 2, 2023, 07:10 AM IST
महात्मा गांधींचा फोटो नोटेवर पहिल्यांदा कधी छापण्यात आला? जाणून घ्या रंजक कहाणी title=

Mahatma Gandhi’s Portrait On Indian Banknotes: आज संपूर्ण देशात महात्मा गांधींची 154 वी जयंती साजरी केली जात आहे. महात्मा गांधी यांनी सत्य आणि अहिंसेची मानवी मूल्ये तसेच समतेची दृष्टी संपूर्ण जगाला दिली. त्यामुळेच आज त्यांचा फोटो देशातील चलनी नोटांवर दिसतो. नोटांवर बापूंचा फोटो आपण रोज पाहतो पण नोटांवर त्याचे चित्र पहिल्यांदा कधी छापले गेले? हा फोटो कोणी काढला? हे तुम्हाला माहीत आहे का? याबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊया. 

हेन्री कार्टियर-ब्रेसन, मार्गारेट बोर्के-व्हाइट आणि मॅक्स डेसफोर सारख्या अनेक महान छायाचित्रकारांनी महात्मा गांधींचे आयुष्यभर फोटो काढले. स्वातंत्र्यानंतर छापण्यात आलेले या नोटांवरील फोटो काढला तेव्हा आपण पारतंत्र्यात होते. सध्या नोटेवर दिसणारा महात्मा गांधी यांचा फोटे 1946 मध्ये काढलेल्या छायाचित्राचे कट-आउट आहे. बापू ब्रिटीश राजकारणी लॉर्ड फ्रेडरिक विल्यम पेथिक-लॉरेन्स यांना भेटायला गेले होते. तेव्हा हे छायाचित्र क्लिक करण्यात आले होते.

हे चित्र का निवडले गेले?

महात्मा गांधी यांच्या इतक्या साऱ्या फोटोंमधून भारतीय चलनावर याच विशिष्ट फोटोची निवड का करण्यात आली? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. या चित्राची निवड करण्यात आली यामागे एक रंजक कहाणी आहे. महात्मा गांधीजींच्या हास्याने लोकांची मने जिंकली होती. सनग्लासेस घातलेला आणि त्याच्या चेहऱ्यावर हसू, यामुळे हा फोटो निवडण्यास भाग पाडले. मात्र, गांधीजींचा हा फोटो कुणी काढला होता, त्याची ओळख अद्याप पटलेली नाही. हा फोटो व्हाईसरॉयच्या घरी काढण्यात आला होता. ज्याला आज राष्ट्रपती भवन म्हणून ओळखले जाते.

गांधीजींचे चित्र पहिल्यांदा नोटांवर कधी छापण्यात आले?

1969 मध्ये गांधीजींचे छायाचित्र पहिल्यांदा भारतीय चलनावर दिसले. जेव्हा त्यांच्या 100 व्या जयंतीनिमित्त एक विशेष मालिका जारी करण्यात आली. आरबीआय गव्हर्नर एलके झा यांच्या स्वाक्षरीने ते छापण्यात आले होते. सर्वात आधी महात्मा गांधींच्या या फोटोसह 10 आणि 100 रुपयांच्या नोटा जारी करण्यात आल्या. यानंतर मार्च 1997 मध्ये 50 रुपयांच्या आणि ऑक्टोबर 1997 मध्ये 500 रुपयांच्या नोटा जारी करण्यात आल्या. ज्यावर त्यांचा फोटो होता. त्यानंतर नोव्हेंबर 2000 मध्ये 1000 रुपयांच्या नोटांवर, ऑगस्ट 2001 मध्ये 20 रुपयांच्या आणि नोव्हेंबर 2001 मध्ये 5 रुपयांच्या नोटांवर त्याचा फोटो दिसला. तेव्हापासून ही मालिका सुरूच आहे.

पहिल्या नोट्सवर कोणते चित्र होते?

1949 मध्ये सरकारने पहिल्यांदा 1 रुपयाच्या नोटेची नवीन रचना तयार केली. त्यावेळी नोटांवर ब्रिटनच्या महाराजांचे चित्र छापण्यात आले होते. यानंतर आता नोटांवर महात्मा गांधींचे चित्र छापावे, असे ठरले होते. मात्र त्यानंतरही 1950 मध्ये 2, 5, 10 आणि 100 रुपयांच्या नोटा छापण्यात आल्या तेव्हा त्यामध्ये अशोक स्तंभाचे चित्र छापण्यात आले. यानंतर 1954 मध्ये 1000, 2000 आणि 10 हजार रुपयांच्या नोटा छापण्यात आल्या. मात्र 1978 मध्ये त्या चलनातून बाहेर काढण्यात आल्या.