योगेश खरे-सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : जनावरांमध्ये वेगानं पसरणाऱ्या लंपी व्हायरसनं (Lampi Virus) सर्वांचीच झोप उडवलीय. त्यात आता कोंबड्यांनाही (Hen) लंपीची लागण होत असल्याचा एका व्हिडिओ व्हायरल होतोय. या व्हिडिओनं चिकन (Chicken) खाण्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केलंय. खरंच कोंबड्यांमध्ये लंपी व्हायरस पसरतोय का? व्हायरल व्हिडिओमागचं नेमकं सत्य काय? पाहूयात हा रिपोर्ट. (fact check lumpy virus is spreading in chickens)
चिकन तंदुरी, चिकन कबाब, चिकन बिर्याणी हे अनेकांचे आवडते पदार्थ. चायनीजमध्ये तर सर्रासपणे चिकनचा वापर होतो. मात्र आता कोंबड्यांनाही लंपीची लागण होत असल्याचा मेसेज सोशल मीडियात व्हायरल होतेय.
आता हा व्हिडिओ पाहा. यात एक व्यक्ती कढईत शिजवण्यासाठी ठेवलेलं चिकन दाखवतीय. त्यात काही किडे वळवळत असल्याचं दिसतंय. हा व्हिडिओ सोशल मीडियात वा-यासारखा पसरलाय. या व्हिडिओसोबत एक मेसेजही व्हायरल होतोय. त्यात काय दावा करण्यात आलाय पाहा.
चिकनमध्ये लंपी रोग आढळून आलाय. सावध राहा, शक्यतो चिकन खाणं टाळा. हा व्हिडिओ बघा, अतिशय गंभीर आजाराला आमंत्रण देऊ नका. चटकदार लाल रस्सा जीवघेणा ठरू शकतो.
मेसेज आणि व्हिडिओसोबत पोल्ट्रीतील काही कोंबड्यांचे फोटोही व्हायरल करण्यात आलेत. त्यात कोंबड्यांवर गाठी दाखवण्यात आल्या आहेत. अनेक जण चिकन खातात, हा लोकांच्या आरोग्याचा प्रश्न असल्यानं झी 24 तासनं या व्हिडिओची सत्यता शोधण्याचा प्रयत्न केला. आमचे प्रतिनिधी पशुसंवर्धन आयुक्तांना भेटले. त्यांना हा व्हिडिओ दाखवला. तेव्हा त्यांनी काय सांगितलं पाहा..
कोंबड्यांना लंपी आजार होत नाही. किंबहूना गायीव्यतिरिक्त इतर पशुपक्षांना किंवा प्राण्यांना लंपीची लागण होत नाही. म्हशींमध्ये लागण होण्याचं प्रमाण अत्यल्प आहे. कोंबड्यांना फाऊल पॉक्स नावाचा सामान्य आजार होतो, त्यामुळे त्यांच्या अंगावर फोड येऊ शकतात. मात्र त्याचा लंपीशी काहीही संबंध नाही.
कोंबड्यांना लंपीची लागण होते हा दावा आमच्या पडताळणीत असत्य ठरलाय. सोशल मीडियात व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ आणि मेसेजेसवर विश्वास ठेऊ नका.