Encounter in Jammu: जम्मूतील राजौरीमध्ये लष्कराच्या चौकीवर दहशतवादी हल्ला; सडेतोड उत्तर देत सैन्याकडून एनकाऊंटर सुरू....

Encounter in Jammu: ज्याची भीती होती तेच होतंय... दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी जम्मू काश्मीरमध्ये मोठ्या कारवाईला सुरुवात...   

सायली पाटील | Updated: Jul 22, 2024, 08:25 AM IST
Encounter in Jammu: जम्मूतील राजौरीमध्ये लष्कराच्या चौकीवर दहशतवादी हल्ला; सडेतोड उत्तर देत सैन्याकडून एनकाऊंटर सुरू.... title=
Encounter in Jammu terror attack on army camp latest updates

Encounter in Jammu: जम्मू काश्मीरमधील (Jammu Kashmir) राजौरी इथं संरक्षण दलाच्या चौकीवर दहशतवाद्यांनी हल्ला चढवला असून, लष्कराच्या वतीनं हा भ्याड हल्ला परतवून लावण्यात आला आहे. या हल्ल्यानंतर दहशतवादी आणि लष्करामध्ये मोठा संघर्ष झाल्याची माहिती वृत्तसंस्थेनं जारी केली. दरम्यान, लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये ही चकामक सुरू असून, राजौरी येथील गुंडा ख्वास भागामध्ये हे एनकाऊंटर झाल्याचं सांगण्यात येत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतलेल्या उच्चस्तरीय बैठकीनंतर जम्मू काश्मीरमध्ये लष्कराची मोठी कुमक तैनात करण्यात आली होती. ज्यानंतर लगेचच हा हल्ला झाल्यामुळं आता या अतिरेकी वृत्तीचं कंबरडं मोडण्यासाठी लष्करानं कंबर कसल्याचं पाहायला मिळत आहे. 

हेसुद्धा वाचा : काहीतरी मोठं घडणार? जम्मू काश्मीरमध्ये रातोरात लष्कराची मोठी कुमक तैनात; अमित शाह यांच्या बैठकीनंतर हालचालींना वेग

मागील काही वर्षांमध्ये तुलनेनं कमी दहशतवादी हल्ले होणाऱ्या जम्मू काश्मीरमध्ये गेल्या महिनाभरामध्ये अतिरेकी हल्ल्यांमध्ये तुलनेनं वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. या सर्व हल्ल्यांसाठी पाकिस्तानला दोष देण्यात येत असून, सीमेपलीकडून घुसखोरी होण्याच्या घटनांमध्येही मोठी वाढ झाल्यामुळं लष्कर सतर्क झालं आहे. 

उच्चस्तरीय बैठकांमध्ये तातडीनं घेतले जात आहेत मोठे निर्णय... 

जम्मू काश्मीरच्या राजौरीमध्ये झालेल्या या हल्ल्यानंतर संरक्षण दलांनी तातडीनं महत्त्वपूर्ण बैठकीचं आयोजन करत या बैठकीला बीएसएफ, सीआरपीएफ, जम्मू काश्मीर पोलीस महा संचालक आणि सुरक्षा यंत्रणेतील उच्चस्तरिय अधिकाऱ्यांचा समावेश होता. या बैठकीमध्ये दहशतवादाशी दोन हात करण्यासाठी सुनियोजीत बेत आखत त्या अनुषंगानं पावलं उचलली जाण्याचे निर्देश देण्यात आले. 

जम्मूमध्ये 50 दहशतवादी सक्रिय 

गुप्तचर यंत्रणांच्या माहितीनुसार जम्मू काश्मीरमध्ये सध्याच्या घडीला साधारण 50 दहशतवादी सक्रिय असून, त्यांचा शोध घेऊन खात्मा करण्यासाठी 500 पॅरा कमांडो या भागात तैनात केले असून, जम्मूमधील घनदाट वनं आणि छुप्या ठिकाणांवर या दहशतवाऱ्यांचा शोध घेण्यात येत आहे.