Electoral Bonds : मागील काही दिवसांपासून देशातील लोकसभा निवडणूक तोंडावर असतानाच प्रचंड चर्चा सुरु आहे ती म्हणजे निवडणूक रोखे, राजकीय देणगी आणि तत्सम गोष्टींची. निवडणूक आयोगानं सर्वोच्च न्यायालयाकडून आखून दिलेल्या वेळेच्या आधीच स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) कडून मिळालेली निवडणूक रोखे संदर्भातील माहिती संकेतस्थळावर जाहीर केली. ज्यामुळं सर्वाधिक राजकीय देणगी देणाऱ्या कंपनीची नावं समोर आली. इतकंच नव्हे, तर कोणत्या राजकीय पक्षाला सर्वाधिक देणगी किंवा निधी मिळाला यासंदर्भातील माहितीही यातून समोर आली.
12 एप्रिल 2019 ते 11 जानेवारी 2024 पर्यंतची ही आकडेवारी असून, या यादीमध्ये लॉटरी किंग सँटियागो मार्टिन (59 वर्षे) यांचं नाव आघाडीवर दिसत आहे. उपलब्ध माहितीनुसार मार्टिन यांनी सर्वाधिक म्हणजेच 1368 कोटी रुपयांचा निधी राजकीय देणगीच्या स्वरुपात दिला होता. त्यांच्या फ्यूचर गेमिंग एंड हॉटेल्स सर्विसेज या कंपनीच्या माध्मयातून हा बॉन्ड 21 ऑक्टोबर 2020 ते जानेवारी 2024 दरम्यान खरेदी करण्यात आला होता. इतका मोठा निधी मार्टिन यांनी दिल्यामुळं आता ते नेमके आहेत कोण हाच प्रश्न विचारला जात आहे.
म्यानमारमधील एक मजूर ते लॉटरी किंग असा मार्टिन यांचा प्रवास नजर रोखतो. जीवनातील एक मोठा काळ हलाखीच्या परिस्थितीचा सामना करणाऱ्या मार्टिन यांचे गरिबीचे दिवस हळुहळू मागे सरत गेले. काळ आणि वेळ बदलत गेली तसतशी त्यांची आर्थिक स्थिती सुधारत गेली. लॉटरीच्या माध्यमातून त्यांनी सामान्यांना धनलाभाची स्वप्न दाखवली आणि नशीबाच्या याच खेळानं त्यांना व्यवसायातील उंची गाठण्यासाठी मदत केली. दक्षिणेमध्ये त्यांची ही फर्म मार्टिन कर्नाटक आणि उत्तर पूर्वेमध्ये मार्टिन सिक्कीम लॉटरीच्या नावे सुरु आहे.
मार्टिन धर्मदाय संस्थेच्या संकेतस्थळावर उपलब्ध असणाऱ्या माहितीनुसार सुरुवातीला म्यानमारमध्ये मजुरी करून मिळालेल्या पैशांवरच मार्टिन यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत होता. पुढं भारतात परतल्यानंतर त्यांनी 1988 मध्ये लॉटरीचा व्यवसाय सुरु केला. कोईंबतूरमधून त्यांनी केरळ आणि कर्नाटकापर्यंत व्यवसायाची व्याप्ती वाढली. भूतान आणि नेपाळपर्यंत त्यांचा व्यवसाय वाढला. पुढं मार्टिन यांचं नाव बांधकाम, रिअल इस्टेट, कापड उद्योग अशा व्यवसायांमध्ये उडी घेतली. सँटियागो मार्टिन ऑल इंडिया फेडरेशन ऑफ लॉटरी ट्रेड एंड अलाइड इंडस्ट्रीजच्या अध्यक्षपदी विराजमान आहेत. भारतात लॉटरीसंदर्भारीत विश्वासार्हता वाढवण्याच्या दृष्टीनं ही संस्था प्रयत्न करते.
मार्टिन आणि त्यांच्या कंपनीवर एप्रिल 2009 ते ऑगस्ट 2010 दरम्यानच्या पुरस्कार विजेत्यांच्या तिकीट दाव्याला दिशाभूल करण्याच्या पद्धतीनं सादर करण्यात आल्याचा आरोप ईडीनं केला आहे. ज्यामुळं सिक्कीमचं तब्बल 910 कोटी रुपयांचं नुकसान झालं होतं. प्रवर्तन निर्देशनालयानं पीएमएलए कायद्याच्या कथित उल्लंघनाप्रकरणी सँटियागो मार्टिन यांच्या कंपनीची आणि तेथील व्यवहारांची चौकशी सुरु केली आहे.
दरम्यान, सँटियागो मार्टिन यांच्याविषयीची बरीच माहिती सध्या टप्प्याटप्प्यानं समोर येत असून, निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीमध्ये मेघा इंजीनियरिंग एंड इंफ्रास्ट्रक्चर लिमिटेडनंही निवडणूक रोखे स्वरुपात 966 कोटी रुपये राजकीय देणगी म्हणून दिले होते. याशिवाय इलेक्टोरल बॉन्ड खरेदी करणाऱ्यांमध्ये डीएलएफ कमर्शियल डेवलपर्स, वेदांता लिमिटेड, अपोलो टायर्स, एडलवाइस, पीवीआर, स्पाइसजेट, इंडिगो, ग्रासिम इंडस्ट्रीज, मेघा इंजीनियरिंग, पीरामल एंटरप्राइजेज, टोरेंट पावर, भारती एयरटेल या कंपन्यांचाही समावेश आहे.