नवी दिल्ली: जागतिक स्तरावर भारताची एक सहिष्णू देश म्हणून ओळख आहे. मात्र, अलीकडच्या काळात देशातून सहिष्णूतेचा हा DNA नाहीसा होत चाललाय, अशी खंत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी व्यक्त केली. ते शुक्रवारी अमेरिकेचे राजनैतिक अधिकारी निकोलस बर्न्स यांच्याशी झालेल्या ऑनलाईन वार्तालापात बोलत होते. यावेळी राहुल गांधी यांनी भारतात लोकांमध्ये दुही पसरवत जात असल्याने देशाचा साचा कमकुवत होत असल्याचे म्हटले.
आपला देश अत्यंत सहिष्णू आहे. आपल्या DNA मध्येच ही सहिष्णूता अस्तित्त्वात आहे. त्यामुळे आपल्याकडे नव्या कल्पनांचे मोकळेपणाने स्वागत केले जाते. मात्र, हल्ली आश्चर्यकारकरित्या हा मोकळेपणा असणारा DNA देशातून गायब होत चालला आहे. त्यामुळे देशात पूर्वीसारखी सहिष्णूता राहिलेली नाही, हे दुर्दैवाने म्हणावेसे वाटते. अमेरिकेतही साधारण हीच परिस्थिती असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले.
अमेरिकेत आफ्रिकन अमेरिकन्स, मेक्सिकन आणि इतर लोकांमध्ये फूट पाडली जाते. भारतात हाच प्रकार हिंदू, मुस्लीम आणि शीखांबाबत घडतो. या सगळ्यामुळे तुम्ही देशाचा साचा कमकुवत करत आहात. मात्र, देश कमकुवत करणारे हे लोक स्वत:ला राष्ट्रवादी म्हणवून घेतात, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.
तर निकोलस बर्न्स यांनीही राहुल गांधींच्या मताला दुजोरा दिला. भारत आणि अमेरिका यांच्यात अनेक बाबींमध्ये साम्य आहे. दोन्ही देशांवर ब्रिटिशांचे राज्य होते. दोन्ही देश वेगवेगळ्या शतकांमध्ये स्वतंत्र झाले. देश म्हणून अनेकदा तुम्हाला आपला मूळ गाभा शोधण्यासाठी चर्चा आणि राजकीय वादविवादातून जावे लागते. आपला देश नक्की काय आहे, हे शोधावे लागते. आपले (अमेरिका) देश स्थलांतरितांचे आहेत, सहिष्णू आहेत, असे निकोलस बर्न्स यांनी म्हटले.
स्थित्यंतरांतून जाणाऱ्या लोकशाही देशांचे सामर्थ्य मला माहिती आहे. आपण राजकीय प्रचार आणि रस्त्यांवरील निदर्शनांमधून परस्परविरोधी विचार मांडतो. किमान आपण या गोष्टी करतो. नाहीतर तुम्ही चीन आणि रशिया या देशांत हुकूमशाही परत आल्याचे बघत असाल. आपण लोकशाही देश काहीवेळा आपल्याकडील स्वातंत्र्यामुळे कटू अनुभवांना सामोरे जातो. मात्र, या सगळ्यामुळेच आपण अधिक कणखर होतो, असेही निकोलस बर्न्स यांनी सांगितले.