नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारचं मॉडेल पूर्णपणे नकारात्मक नाही. त्यामुळे त्यांची खलनायकासारखी प्रतिमा तयार करून काही मिळणार नाही, असे वक्तव्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी केले आहे. २०१४ ते २०१९ याकाळात पंतप्रधान मोदींनी केलेल्या कामाचे महत्त्व समजून घ्या. त्यामुळेच मोदी सरकार पुन्हा सत्तेत आल्याचेही जयराम रमेश यांनी म्हटले. ते गुरुवारी दिल्लीत एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बोलत होते.
यावेळी त्यांनी काँग्रेससह विरोधकांच्या डोळ्यात अंजन घातले. त्यांनी म्हटले की, नरेंद्र मोदी लोकांना समजेल अशा भाषेत बोलतात. मोदी यापूर्वी कधीच झाल्या नाहीत अशा गोष्टी करत आहेत, हेच लोकांच्या लक्षात राहते. ही गोष्ट जोपर्यंत विरोधक लक्षात घेणार नाहीत तोपर्यंत मोदींना हरवणे शक्य नाही, असे मत जयराम रमेश यांनी मांडले.
तसेच तुम्ही प्रत्येकवेळी मोदींचे प्रतिमाहनन करण्याचा प्रयत्न केलात तर तुम्ही कधीच यशस्वी होणार नाही, असा इशाराही त्यांनी विरोधकांना दिला.
मोदींनी गेल्या पाच वर्षांमध्ये काय काम केले, हे लक्षात घेणे गरजेचे आहे. त्यामुळेच लोकसभा निवडणुकीत तब्बल ३० टक्के मते मिळवून ते पुन्हा सत्तेत आले. मी मोदींचा प्रशंसक किंवा टीकाकार नाही. मात्र, मोदींनी प्रचलित व्यवस्थेत नव्या गोष्टी विशेषत: प्रशासकीय अर्थशास्त्र वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने अंमलात आणले.
अर्थशास्त्राच्या दृष्टीकोनातून पाहायचे झाल्यास प्रशासकीय पातळीवर सर्वच गोष्टी चुकीच्या झालेल्या नाहीत. राजकीय पातळीवर प्रशासनात काय झाले, ही बाब पूर्णपणे भिन्न आहे. त्यासाठी जयराम रमेश यांनी पंतप्रदान उज्ज्वला योजनेचे उदाहरण दिले. २०१९ मध्ये आपण सर्वजण मोदींच्या योजनांची खिल्ली उडवत होतो. मात्र, अनेक राजकीय सर्वेक्षणांमध्ये हे दिसून आले आहे की, पंतप्रधान उज्ज्वला योजनेमुळे मोदी कोट्यवधी महिलांपर्यंत पोहोचले. याचाच फायदा त्यांना निवडणुकीत मिळाला, याकडे जयराम रमेश यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.