काँग्रेसचे नेते डी.के. शिवकुमार यांचा जामीन अर्ज फेटाळला

 काँग्रेस नेते डी. के. शिवकुमार यांचा नियमित जामीन अर्ज न्यायालयाने आज फेटाळून लावला आहे. 

ANI | Updated: Sep 25, 2019, 09:22 PM IST
काँग्रेसचे नेते डी.के. शिवकुमार यांचा जामीन अर्ज फेटाळला title=
संग्रहित छाया

नवी दिल्ली : मनी लाँड्रिंग प्रकरणात कर्नाटकचे काँग्रेस नेते डी. के. शिवकुमार यांचा नियमित जामीन अर्ज न्यायालयाने आज फेटाळून लावला आहे. त्यामुळे शिवकुमार यांचा तिहार जेलमधील मुक्काम वाढला आहे.

शिवकुमार यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) ३ सप्टेंबर २०१९ रोजी हवाला आणि आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अटक केली होती. हा काँग्रेससाठी मोठा धक्का होता. अटक केल्यानंतर त्यांची रवानगी तिहार जेलमध्ये करण्यात आली. दरम्यान, त्यांनी जामीन मिळावा यासाठी त्यांनी अर्ज केला होता. मात्र, न्यायालयाकडून त्यांना कोणताही दिलासा मिळालेला नाही.

शिवकुमार हे ईडीला चौकशीसाठी सहकार्य करीत नाहीत. त्यामुळे त्यांना जामीन देऊ नये, अशी मागणी ईडीकडून युक्तीवाद करणाऱ्या वकीलांनी केली. जर त्यांना जामीन मिळाला तर तपासावर याचा परिणाम होईल, असेही स्पष्ट करण्यात आले. त्यानंतर न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला.

दरम्यान, शिवकुमार यांची बाजू मांडणार वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी ईडीच्या युक्तीवादाला विरोध केला. शिवकुमार यांच्यावरील आरोप अजून सिद्ध झालेले नाहीत. त्यामुळे त्यांनी जामीन मिळण्याचा अधिकार राहतो, असे न्यायालयाला सांगितले. मात्र, न्यायालयाने बाजू ऐकून घेतल्यानंतर जामीन अर्ज फेटाळला.