मेट्रोतून उतरताना साडी दरवाजात अडकली, मेट्रोने महिलेला फरफटत नेले, दुर्दैवी मृत्यू

Metro Accident News: दिल्लीतील मेट्रो स्थानकात हृदयद्रावत अपघात घडला आहे. मेट्रोच्या दरवाजात साडी अडकल्याने महिलेचा मृत्यू झाला आहे.

मानसी क्षीरसागर | Updated: Dec 17, 2023, 11:07 AM IST
मेट्रोतून उतरताना साडी दरवाजात अडकली, मेट्रोने महिलेला फरफटत नेले, दुर्दैवी मृत्यू title=
Delhi Metro Woman Dies After Clothes Get Stuck In Metro Door

Metro Accident News: मेट्रोमध्ये एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दिल्ली मेट्रोच्या दरवाजात साडी व जॅकेट अडकल्याने या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली असून मेट्रोचा भोंगळ कारभारही समोर आल्याने प्रवाशांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. 14 डिसेंबर रोजी इंद्रलोक मेट्रो स्थानकात ही घटना घडली आहे. 

मेट्रोच्या दरवाजात अडकली साडी

महिलेच्या मृत्यूनंतर दिल्ली मेट्रो रेल्वे कॉरपोरेशनच्या एका अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेची साडी मेट्रोच्या दरवाज्यात अडकली आणि त्यामुळं मेट्रो सुरू झाल्यानंतर महिला मेट्रोसह फरफटत पुढे गेली. या दुर्घटनेत ती गंभीर जखमी झाली. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र जबर मार बसल्याने तिचा रुग्णालयात मृत्यू झाला. महिला तिच्या मुलासह नागलोईतून मोहन नगरयेथे जात होती. तेव्हाच ही दुर्घटना घडली आहे. 

मेट्रोने फरफटत नेले 

मेट्रोच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सुरुवातीच्या तपासणीत समोर आले आहे की, दिल्ली मेट्रोच्या दरवाजाचे सेन्सर बिघडला होता. त्यामुळं महिलांच्या कपड्यांबाबत सेन्सरला अचूक सांगता आले नाही. त्यामुळं ही दुर्घटना घडली आहे. पीडित महिला कित्येत मीटरपर्यंत फरफटत गेली. अखेर ती मेट्रोच्या ट्रॅकवर कोसळली. त्यानंतर तिला तातडीने सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आणि न्यूरो सर्जनच्या आयसीयू वॉर्डमध्ये तिच्यावर उपचार सुरू करण्यात आले. 

उपचारादरम्यान मृत्यू

दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे प्रवक्ता अनुज दयाल यांच्या म्हणण्यानुसार, 14 डिसेंबर रोजी इंद्रलोक येथे मेट्रो स्थानकात ही घटना घडली आहे. प्राथमिकदृष्ट्या महिलेची साडी मेट्रोच्या दरवाजात अडकली होती. त्यामुळं ती जखमी झाली आहे. उपचारादरम्यान शनिवारी तिचा मृत्यू झाला आहे. मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त (सीएमआरएस) या घटनेची चौकशी करत आहेत. सीएमआरएसला वेळेत या घटनेचा अहवाल देण्यास सांगितला आहे. 

एकल पालक होती महिला

दिल्ली मेट्रोने दिलेल्या माहितीनुसार, या महिलेची ओळख रीना देवी या नावाने पटली असून तीला 14 वर्षांचा मुलगा आहे. ती एकल पालक होती. रीनाच्या मृत्यूनंतर तिचा मुलगा अनाथ झाला असल्याने परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.