'गटारातील तिच्या मृतदेहावर मी...'; पोलिसाने 2021 साली केलेल्या हत्येचा धक्कादायक खुलासा

Delhi Crime News Cop Killed Woman: या प्रकरणाचा खुलासा 2 वर्षांहून अधिक काळानंतर झाला असून समोर आलेला प्रकार पाहून पोलिसांनाही मोठा धक्का बसला आहे. पोलीस दलातील व्यक्तीनेच आपल्या सहकाऱ्याला इतक्या निघ्रृणपणे संपवल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Feb 29, 2024, 02:24 PM IST
'गटारातील तिच्या मृतदेहावर मी...'; पोलिसाने 2021 साली केलेल्या हत्येचा धक्कादायक खुलासा title=
पोलिसांनी 3 वर्षांनंतर लावला गुन्ह्याचा छडा

Delhi Crime News Cop Killed Woman: दिल्लीमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दिल्ली पोलिसांच्या मुख्य हवालदाराने आपल्या सहकारी महिला हवालदाराची हत्या केली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे ही हत्या 2021 साली झाली असून 2 वर्षांहून अधिक काळापासून त्याने हे सत्य लपवून ठेवलं होतं. आरोपीचं नावं सुरेंद्र सिंह राणा असं आहे. सुरेंद्रने मोनिका यादव या आपल्या महिला सहकाऱ्याला लग्नाची मागणी घातली होती. मात्र तिने नकार दिल्याने सुरेंद्रने तिची हत्या केली. सुरेंद्रने मोनिकाची आई शकुंतला आणि बहिणी पोर्णिमा यांनाही 2 वर्ष अंधारात ठेवलं. मोनिकाच्या घरच्यांना सुरेंद्रने तिने एका पुरुषाबरोबर पळून जाऊन लग्न केलं आहे असं सांगितलं. 

गटारात टाकला मृतदेह

मात्र सत्य असं आहे की, सुरेंद्र मोनिकाला दिल्लीतील मुखमलपूर येथील निर्जन स्थळी नेलं. त्याने तिला अनेकदा कानाखाली मारली. त्यानंतर त्याने तिला 25 ते 30 मीटर खोल गटारामध्ये ढकलून दिलं. यानंतर त्याने तिचा गळा दाबून हत्या केली. मोनिकाचा मृतदेह त्याने गटारामध्येच टाकला आणि त्यावर दगड टाकले. डिसेंबर महिन्यामध्ये पोलिसांनी या प्रकरणात दाखल केलेल्या तक्रारीत असं नमूद करण्यात आलं आहे.

कामाच्या ठिकाणी मैत्री

ऑक्टोबर 2021 पासून मोनिका बेपत्ता आहे. मोनिकाच्या कुटुंबाने ती राहत असलेल्या ठिकाणाही पीजीमध्येही भेट दिली. मात्र मोनिका कुठेच सापडली नाही. त्यांनी 20 ऑक्टोबर रोजी मोनिका बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. सुरेंद्र आणि मोनिका पीसीआर युनिटमध्ये एकत्र काम करायचे. कामाच्या ठिकाणीच त्यांची मैत्री झाली आणि सुरेंद्रला मोनिका आवडू लागली. "तिच्या वडिलांचं निधन झाल्यानंतर तिचा माझ्यावरील विश्वास वाढला. आम्ही दोघे रोज फोनवर बोलायचो. तिने कायमचं माझं व्हावं अशी माझी इच्छा होती," असा जबाब सुरेंद्रने नोंदवला आहे.

यूपीएससीसाठी तिने नोकरी सोडली

2021 मध्ये मोनिकाने पोलीस दलातून राजीनामा दिला. तिला युपीएससी परीक्षेची तयारी करायची होती. संस्कृती आयएएस सेंटरमध्ये मीच मोनिकाला दाखला मिळवून दिला असं सुरेंद्रने म्हटलं आहे. त्याच वर्षी 8 सप्टेंबर रोजी दोघे मुखर्जी नगरमधील वर्धमान मॉलमध्ये फिरायला गेले होते. तेव्हा सुरेंद्रने मोनिकाला लग्नासाठी मागणी घातली. "माझ्याशी लग्न कर अशी मागणी मी तिला अनेकदा घातली. मात्र मी आयएएस व्हावं हे माझ्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करायचं सांगून लग्नास नकार दिला," असं सुरेंद्र म्हणाला. 

मॉलमधून निघाले अन्...

यानंतर सायंकाळी 5 च्या सुमारास मोनिका आणि सुरेंद्र मॉलमधून निघाले. सुरेंद्र मोनिकाला बहिणीकडे घेऊन जातो सांगून अलीपूरमध्ये घेऊन गेला. सुरेंद्रने बुधापूरमध्ये पुन्हा मोनिकाला मागणी घातली. "तिने पुन्हा मला नकार दिल्यानंतर मी तिच्याकानाखाली मारली. त्यानंतर मी तिला गटारात ढकलून दिलं. मात्र त्यामधूनही ती वाचली. ती या घटनेची वाच्यता करेल अशी भिती मला वाटली. त्यानंतर मी गळा दाबून तिची हत्या केली. गटारामधील तिच्या मृतदेह मी दगड टाकले. तो मृतदेह झाकण्याचा माझा प्रयत्न होता," असं सुरेंद्र म्हणाला.

फोन कॉल रेकॉर्डवरुन अटक

मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात पोलिसांनी सुरेंद्रला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी केली जात आहे. फोन कॉल रेकॉर्डवरुन त्याला अटक करण्यात आली. 'अरविंद' नावाच्या एका व्यक्तीला आपण फोन करत होतो असा दावा सुरेंद्रने केला. मोनिकाने अरविंदशी लग्न केल्याचं सुरेंद्रने अटकेच्यावेळेस सांगितलं. मात्र हा फोन नंबर सुरेंद्रच्या बहिणीच्या नवऱ्याचा होता असं स्पष्ट झालं. पोलिसांनी सुरेंद्रला फोन आणि सिमकार्ड विकणारा त्याच्या बहिणीचा नवरा राजपाललाही अटक केली आहे. मागील वर्षी 30 सप्टेंबर रोजी पोलिसांना गुन्हा घडला त्या ठिकाणावरुन दगडांखालून एक मानवी सांगाडा सापडला आहे. आता मोनिकाच्या आईचे नमुने घेऊन या सांगाड्याची डीएनए चाचणी केली जाणार आहे.