बापाच्या चितेला अग्नी देण्यासाठी स्मशानात पोहोचल्या 9 मुली; मृतदेहाला खांदा दिलेला पाहून सगळेजण हळहळले

मध्य प्रदेशात पित्याचं निधन झाल्यानंतर सर्व मुलींनी एकत्रितपणे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला. सर्व मुली मुखाग्नी देण्यासाठी स्मशानभूमीत पोहोचल्या होत्या. यावेळी सर्वांचेच डोळे पाणावले.   

शिवराज यादव | Updated: Feb 27, 2024, 04:50 PM IST
बापाच्या चितेला अग्नी देण्यासाठी स्मशानात पोहोचल्या 9 मुली; मृतदेहाला खांदा दिलेला पाहून सगळेजण हळहळले title=

पूर्वीच्या काळात प्रत्येक जोडप्याला आपल्या कुटुंबाला वंशाचा दिवा असावा असं वाटत होतं. यामुळेच मुलासाठी अट्टहास केला जात असे. काही कुटुबांमध्ये तर मुलाचा जन्म होईपर्यंत मुलींची अक्षरश: रांगच लागत होती. पण मोठं झाल्यांतर मुलगा आपलं कर्तव्य पार पाडेलच याची हमी मात्र नव्हतीच. पण मध्य प्रदेशातील एका घटनेने मुलीदेखील मुलांप्रमाणे कर्तव्य निभावू शकतात हे दाखवून दिलं आहे. सागर जिल्ह्यात 9 मुलींनी आपलं कर्तव्य निभावत वडिलांच्या मृतदेहाला अग्नी दिला. सर्व मुली मुखाग्नी देण्यासाठी स्मशानभूमीत पोहोचल्या होत्या. यावेळी सर्वांचेच डोळे पाणावले. 

सागर जिल्ह्यात वडिलांचं निधन झाल्यानंतर 9 मुलींनी आपलं कर्तव्य निभावत मुखाग्नी दिला. हे दृश्य पाहिल्यानंतर उपस्थित अनेकांच्या डोळ्यात पाणी आलं होतं. मुलींनी फक्त मृतदेहाला मुखाग्नीच दिला नाही, तर तिरडीला खांदाही दिला. स्मशानभूमीत त्यांच्यावर हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आले. 

मकरोनियाच्या मुक्तिधाम येथे हे दृश्य पाहण्यास मिळालं. पोलीस एसआयई हरिश्चंद्र अहिरवार वॉर्ड क्रमांक 17 च्या 10 व्या बटालियन क्षेत्रात वास्तव्यास होते. सोमवारी ब्रेन हॅमरेजमुळे त्यांचं निधन झालं. हरिश्चंद्र यांना एकूण 9 मुली असून, एकही मुलगा नाही. यामुळे हरिश्चंद्र यांनी मुलींचा सांभाळ मुलांप्रमाणेच केला होता. त्यांच्या 7 मुलींचं लग्न झालं असून, आता त्याच मुलींनी शेवटच्या क्षणी आपलं कर्तव्य पार पाडलं आहे. 

मुलींनी आपल्या वडिलांना हिंदू परंपरेनुसार खांदा दिला आणि इतरही विधी पार पाडले. विशेष म्हणजे लोकांनीही यावेळी त्यांना पाठिंबा दिला. मुलगाच म्हणजे सर्व काही नाही असंही ते म्हणाले. 7 मुलींचं लग्न झालं असून, रोशनी आणि गुडिया या दोन मुली अविवाहित आहेत. 

मुलगी वंदनाने सांगितलं की, वडिलांचा आमच्या सर्वांवर फार जीव होती. आम्हाला भाऊ नाही. यामुळेच सर्व छोट्या बहिणी अनिता, तारा, जयश्री, कल्पना, रिंकी, गुड़िया, रोशनी आणि दुर्गा यांनी एकत्रित कर्तव्य पार पाडण्याचं ठरवलं. वडीलच आमचं सर्व काही होते. 

विशेष म्हणजे बुंदेलखंडमध्ये मुली आणि महिलांना प्रवेश करण्याची परवानगी नाही. पण आता समाज जुन्या परंपरांना तोडीत काढत आहे. मुलींनी वडिलांवर अंत्यसंस्कार करणं इतरांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.