सेल्फी घेतला, WhatsApp ला स्टेटस ठेवला अन् नंतर एकत्र बसून तयार केला गळफास; प्रेमाचा धक्कादायक शेवट

Couple Suicide in Rajasthan: राजस्थानच्या (Rajasthan) बाडमेरे येथे एका प्रेमी युगुलाने आत्महत्या (Suicide) केल्याने खळबळ उडाली आहे. मुलीच्या कुटुंबीयांनी तिचा साखरपुडा ठरवला होता. पण आपल्या प्रियकरापासून दूर होण्याची तिची इच्छा नव्हती. कुटुंब आपल्याला एकत्र येऊ देणार नाही याची कल्पना आल्यानंतर दोघांनीही आत्महत्या केली.   

शिवराज यादव | Updated: Jun 12, 2023, 06:06 PM IST
सेल्फी घेतला, WhatsApp ला स्टेटस ठेवला अन् नंतर एकत्र बसून तयार केला गळफास; प्रेमाचा धक्कादायक शेवट title=

Rajasthan Couple Suicide News: राजस्थानच्या (Rajasthan) बाडमेरे येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे प्रेमी युगुलाने आत्महत्या (Suicide) केल्याने खळबळ उडाली आहे. दोघांनी आत्महत्या करण्यााधी सेल्फी घेतली. नंतर त्यांनी तो फोटो व्हॉट्सअप स्टेटसला ठेवला होता. घरापासून दूर एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत दोघांचा मृतदेह आढळला. 

मांगता गावात ही घटना घडली आहे. नरेश कुमार यांची 19 वर्षीय मुलगी खुशी आणि बाबूलाल यांचा 21 वर्षीय मुलगा ओमप्रकाश यांनी आत्महत्या करत आपलं जीवन संपवलं आहे. दोघांचं एकमेकांवर प्रचंड प्रेम होतं. पण काही दिवसांपूर्वी मुलीच्या कुटुंबीयांनी तिचा साखरपुडा ठरवला होता. पण आपल्या प्रियकरापासून दूर होण्याची तिची इच्छा नव्हती. कुटुंब आपल्याला एकत्र येऊ देणार नाही याची कल्पना आल्यानंतर दोघांनीही आत्महत्या केली. 

बुधवारी रात्री दोघेही घराबाहेर पडले होते. यानंतर दोघे गावातील सरकारी शाळेत पोहोचले. तिथे बराच वेळ दोघे एकत्र होते. याचवेळी त्यांनी आपल्या प्रेमाची अखेरची आठवण म्हणून एक सेल्फी घेतला. दोघांनीही हा फोटो व्हॉट्सअपला स्टेटस ठेवला. यानंतर दोघांनी कपड्याच्या पिशवीपासून गळफास तयार केला आणि नंतर आपलं आयुष्य संपवलं. 

दोघे घरात नसल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी शोध घेण्यास सुरुवात केली होती. शोध घेत असताना तरुणीची आई शाळेजवळ पोहोचली असता झाडाला लटकलेला मृतदेह पाहून ती जोरजोरात ओरडू लागली. त्यांचा आवाज ऐकून गावातील लोकांना धाव घेतली असता सर्वांनाच धक्का बसला. 

यानंतर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी मृतदेह खाली उतरवले आणि धोरीमन्ना रुग्णालयातील शवगृहात ठेवले. शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह कुटुंबीयांकडे सोपवण्यात आले. 

धोरीमन्ना पोलीस ठाण्याचे एएसआय लाखाराम यांनी प्राथमिकदृष्ट्या हे प्रेमप्रकरण दिसत आहे. दरम्यान, तरुणीच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तपास सुरु केला आहे.