कोरोनाशी लढा देण्यात पंतप्रधान मोदी पहिल्या क्रमांकावर

कोरोना व्हायरस माहामारी वेळी लोकप्रियतेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी अव्वल; मोदींची लोकप्रियता वाढण्यामागे काय आहेत कारणं? 

Updated: Apr 22, 2020, 11:42 AM IST
कोरोनाशी लढा देण्यात पंतप्रधान मोदी पहिल्या क्रमांकावर title=
संग्रहित फोटो

नवी दिल्ली : कोरोना व्हायरस माहामारी वेळी लोकप्रियतेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) वर्ल्ड लिडर्सला मागे टाकत पहिल्या क्रमांकावर पोहचले आहेत. अमेरिकेतील ग्लोबल डेटा इंटेलिजेन्स कंपनी (Global Data Intelligence) मॉर्निंग कन्सल्ट पॉलिटिकल इंटेलिजेन्सने (Morning Consult Political Intelligence) एक रेटिंग यादी जाहीर केली आहे. कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर जगातील नेत्यांची कार्य करण्याची क्षमता आणि त्यांच्यावरील लोकांचा विश्वास लक्षात घेऊन हे रेटिंग जाहीर करण्यात आलं आहे.

या रेटिंगमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अप्रुवल रेटिंग  (Approval Rating) जगातील इतर सर्व नेत्यांहून सर्वात वरच्या क्रमांकावर आहे. या रेटिंगमध्ये नरेंद्र मोदी 68 अप्रुवल पॉईंट्ससह पहिल्या क्रमांकावर आहेत. 

तर अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांना उणे 3 (-3) अप्रुवल रेटिंग पॉईंट्स मिळाले आहेत. 10 नेत्यांच्या या यादीमध्ये ट्रम्प आठव्या क्रमांकावर आहेत. या रेटिंगसाठी, 1 जानेवारी 2020 ते 14 एप्रिल 2020 पर्यंत लोकांना जगातील इतर नेत्यांशी संबंधित प्रश्न विचारले गेले होते. 

मिळालेल्या माहितीनुसार, दररोज सरासरी 447 लोकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. 1 जानेवारी 2020 रोजी नरेंद्र मोदी यांचे अप्रुवल रेटिंग पॉईंट्स 62 होते. तर 14 एप्रिल दरम्यान ते 68 झाले. तर 1 जानेवारी रोजी ट्रम्प यांचं रेटिंग उणे 10 होतं आणि 14 एप्रिलपर्यंत ते  उणे 3 वर पोहचलं.

या यादीमध्ये पंतप्रधान मोदी पहिल्या क्रमांकावर आहेत. दुसऱ्या क्रमांकावर मॅक्सिकोचे राष्ट्रपती आणि तिसऱ्या क्रमांकावर ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन आहेत. या यादीमध्ये ट्रम्प आठव्या क्रमांकावर आहेत.

पंतप्रधान मोदींच्या रेटिंगमध्ये सुधारणा होण्याचं कारण म्हणजे कोरोना व्हायरसवर मात करण्यासाठीची त्यांची तयारी आणि त्यासंबंधित तात्काळ निर्णय घेण्याची त्यांची क्षमता. कोरोनाचा धोका पाहता भारताने इतर देशांच्या तुलनेत सर्वात आधी विमानतळांवर स्क्रिनिंगची व्यवस्था सुरु केली. चीनच्या वुहानमध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता तेथे अडकलेल्या भारतीयांना, भारतीय विद्यार्थ्यांना तात्काळ एअरलिफ्ट करण्यात आलं.

पंतप्रधानांनी 25 मार्च रोजी 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली. त्यानंतर पुन्हा आणखी 19 दिवसांसाठी लॉकडाऊन वाढवण्यात आला. मोदींनी, या साथीच्या रोगाचा सामना करण्यासाठी जागतिक नेत्यांना एकत्र करण्याचाही प्रयत्न केला. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सार्क देशांच्या बैठक घेण्यास, तसेच जी ​​-20 देशांच्या बैठकी घेण्यासही त्यांनी पुढाकार घेतला. या सर्व कारणांमुळे जगभरात पंतप्रधान मोदींची लोकप्रियता वाढली आहे.

या व्यतिरिक्त कोरोना संकटाच्या वेळी जेव्हा प्रत्येक देश स्वतःबद्दल आणि आपल्या लोकांचा विचार करत असताना, अशा काळातही मोदींनी पुढे येऊन अमेरिकेसह इतर देशांनाही मदत केली. अत्यावश्यक औषधांच्या निर्यातीवरील बंदी काढून त्यांनी मदत करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. याबाबत अनेक देशांनीही मोदींच्या या कृतीबाबत भारताचे, मोदींचे आभार मानले आहेत.