नवी दिल्ली: देशात कोरोनाची साथ येऊन जवळपास सहा महिने उलटल्यानंतर आता परिस्थिती काही प्रमाणात सुधारल्याचे संकेत मिळत आहेत. आतापर्यंत देशातील तब्बल २७ लाख लोकांना कोरोनाची लागण झाली असून त्यापैकी ५२००० लोकांचा मृत्यू झाला आहे. मात्र, गेल्या दोन आठवड्यांतील परिस्थिती कायम राहिल्यास आगामी काळात देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्याची शक्यता आहे. कारण, मे महिन्यानंतर पहिल्यांदाच positivity rate कमी झाल्याचे निदर्शनास आले आहे. या काळात करण्यात आलेल्या कोरोना चाचण्यांमध्ये लोकांचा अहवाल पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण पूर्वीपेक्षा कमी आहे.
यापूर्वी ९ ऑगस्ट रोजी देशातील कोरोना पॉझिटिव्हिटी रेट ९ टक्क्यांवर पोहोचला होता. मात्र, गेल्या काही दिवसांतील परिस्थिती पाहता यामध्ये किंचित घट (८.७२ टक्के ) होऊन तो स्थिरावला आहे. देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत गेला तसे रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचे प्रमाणही वाढत गेले. देशाने प्रत्येक दिवशी ६० हजार रुग्ण सापडण्याचा टप्पा पार करण्यापूर्वी केवळ आठ दिवसांसाठीच परिस्थिती काहीशी नियंत्रणात होती. या आठ दिवसांत दरदिवशी साधारण ५० हजार रुग्ण सापडले होते. त्यापूर्वीही दरदिवशी सापडणाऱ्या रुग्णांचा आकडा कमी असला तरी कोरोनाचा प्रसार खूपच वेगाने सुरु होता. मात्र, आता वेग मंदावला असून कोरोनाचे रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ३० दिवसांवर जाऊन पोहोचला आहे.
यापूर्वी अमेरिका आणि ब्राझीलमध्येही प्रत्येक दिवशी सापडणाऱ्या रुग्णांची संख्या याच पातळीला येऊन पोहोचली होती. जुलै महिन्यातील चार दिवस तर अमेरिकेत प्रत्येक दिवशी जवळपास ७० हजार नवे रुग्ण मिळाले होते. मात्र, यानंतर रुग्णांच्या संख्येत मोठी घट पाहायला मिळाली. आता अमेरिकेत प्रत्येक दिवसाला ४० ते ५० हजार नवे रुग्ण आढळत आहेत. तर ब्राझील आतापर्यंत एका दिवसात ६९ हजार रुग्ण सापडण्याच्या पातळीपर्यंत जाऊन पोहोचला आहे. अमेरिकेत आतापर्यंत ५४ लाख तर ब्राझीलमध्ये ३४ लाख लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर अमेरिका व ब्राझीलमधील मृतांचा आकडा अनुक्रमे १.७ लाख आणि १.१ लाख इतका आहे.