गेल्या २४ तासांत देशात ९१८ नवे कोरोना रुग्ण - आरोग्य मंत्रालय

आतापर्यंत देशात ७६५ जण कोरोनातून बरे झाले आहेत.

Updated: Apr 12, 2020, 05:46 PM IST
गेल्या २४ तासांत देशात ९१८ नवे कोरोना रुग्ण - आरोग्य मंत्रालय title=
संग्रहित फोटो

नवी दिल्ली : देशभरात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढून ८४४७वर पोहचली आहे. गेल्या २४ तासांत ३१ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर गेल्या २४ तासांत कोरोना संसर्गाचे ९१८ नवे रुग्ण आढळले आहेत. कोरोनामुळे संपूर्ण देशात आतापर्यंत २७३ जणांचा मृत्यू झाला आहे. 

आतापर्यंत देशात ७६५ जण कोरोनातून पूर्णपणे बरे झाले असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी दिली आहे.

२९ मार्च रोजी कोरोना रुग्णांची संख्या ९७९ इतकी होती. कोरोनाग्रस्तांच्या संख्येत आता वाढ होऊन ही संख्या ८४४७ वर पोहचली आहे. यापैकी २० टक्के रुग्णांना गंभीर उपचारांची म्हणजेच आयसीयू, व्हेटिंलेटरची गरज असल्याचं अग्रवाल यांनी सांगितलं.

कोरोना रुग्णांची संख्या वाढत गेल्यास रुग्णालयं आणि बेडची संख्यादेखील वाढवण्यात येत आहे. आयसीयू, व्हेंटिलेटर आणि इतर मेडिकल उपकरणांबाबत कोणतीही चिंता वाढू नये यासाठी ही माहिती देण्यात येत असल्याचं आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे.

आंतरराज्यीय मालवाहतूक चालवण्यावर कोणतेही बंधन नाही. जीवनावश्यक वस्तूंच्या उत्पादनावर बंदी नाही. गोदामं, कोल्ड स्टोरेजद्वारे वस्तूंचा साठा करता येऊ शकतो, योग्यरित्या हे काम होण्याकडे लक्ष देण्याबाबत आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे. तसंच सध्या लोकांकडून सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे सायबर क्राईमाबाबतही जागरुकता करण्यात येत असल्याचंही सांगण्यात आलं आहे.

सर्व राज्यांमध्ये लॉकडाऊन आहे. डोर-टू-डोरवर फोकस करण्यात येतोय. ग्रामीण भागात अन्न पुरवठ्याबाबत काम सुरु असल्याची माहिती देण्यात आली आहे.