Corona Update : कोरोनाचा XXB व्हेरिएंट किती धोकादायक? काय आहेत लक्षण? वाचा तज्ज्ञांचं मत

चीनमध्ये कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे भारतात अलर्ट जारी करण्यात आला आहे, यातच भारतात XXB या सब व्हेरिएंटबद्दल चुकीची माहिती पसरवली जात आहे

Updated: Dec 23, 2022, 08:11 PM IST
Corona Update : कोरोनाचा XXB व्हेरिएंट किती धोकादायक? काय आहेत लक्षण? वाचा तज्ज्ञांचं मत title=
संग्रहित फोटो

Corona Update News : चीनसह (China) काही देशात कोरोनाने (Corona) थैमान घातलं असून भारतातही अलर्ट (Corona Alert) जारी करण्यात आला आहे. चीनमध्ये ऑमायक्रॉनचा (Omicron) सबव्हेरिएंट असलेल्या BF.7 विषाणूने धुमाकूळ घातला असून रुग्णवाढीचा वेगही प्रचंड आहे. अशातच गेल्या काही दिवसात सब व्हेरिएंट XXB या विषाणूचीही दहशत पसरली आहे. XXB हा ओमायक्रॉनचा सबव्हेरिएंट (Sub Variant) आहे. काही सोशल मीडियावर हा व्हेरिएंट महाभयानक असल्याचा प्रचार केला जातोय. भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेस कारणीभूत ठरलेल्या डेल्टा व्हेरिएंटपेक्षाही (Delta Variant) XXB हा व्हेरिएंट पाचपट घातक असल्याचं सांगितलं जातंय.

XXB विषाणू किती धोकादायक?
पण प्रत्यक्षात तज्ज्ञांनी दिलेली माहिती दिलासा देणारी आहे. 'द इंडियन सार्स-सीओवी-2 जिनेमिक्स कंसॉर्शियम' (INSACOG)चे प्रमुख डॉक्टर एन के अरोरा यांनी दिलेल्या माहितीनुसार जे कोरोना रुग्ण सापडत आहेत, त्यापैकी 40 ते 50 टक्के रुग्ण XXB विषाणूने संक्रमित आहेत. पण विषाणूची काही वेगळी लक्षणं नाहीत. या विषाणूमुळे कोणतीही गंभीर परिस्थिती निर्माण होईल अशी परिस्थिती नाही, किंवा रुग्णाला रुग्णालयातही दाखल करण्याची गरज नाही, इतकंच नाही तर मृत्यूची नोंद नाही. या विषाणूमुळ घाबरुन जाऊ नये असं डॉ. अरोरा यांनी म्हटलं आहे. 

डॉक्टर आणि तज्ज्ञांची नजर
XXB हा सब व्हेरिएंट याआधी सिंगापूर आणि अमेरिकामध्ये आढळला होता. सिंगापूरमध्ये या विषाणूमुळे कोणत्याही रुग्णाची गंभीर परिस्थिती नव्हती, तसंच रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांमध्येही वाढ झाली नव्हती. असं असलं तरी डॉक्टरांकडून या विषाणूच्या तीव्रतेवर नजर ठेवली जात आहे. दिल्लीच्या ILBS हॉस्पिटल आणि LNJP या दोन केंद्रांवर जीनोम चाचणी केली जात आहे. नोव्हेंबरमध्ये शेवटचं जीनोम स्कॅन करण्यात आलं होतं. त्यानंतर रुग्णांची संख्या बरीच कमी झाली आहे. त्यावेळी दिल्लीत XBB विषाणूचं सर्वाधिक संक्रमण आढळून आलं होतं. दिल्लीत आतापर्यंत BC.7 सब व्हेरिएंटचा एकही रुग्ण नाहीए, आतापर्यंत जितके रुग्ण आढळून आले आहेत, त्यात XXB विषाणूची लक्षण दिसून आली आहेत. 

व्हेरिएंटबद्दल चुकीच्या माहितीचा प्रसार
मौलाना आजाद मेडिकल कॉलेजच्या कम्यूनिटी मेडिसिन डॉ. नंदिन शर्मा यांनीही XXB सब व्हेरिएंट जास्त धोकादायक नसल्याचं म्हटलं आहे. काही व्हॉट्सग्रुपवर ओमायक्रॉनचा XXB हा व्हेरिएंट डेल्टापेक्षा पाच पट अधिक घातक असल्याचा मेसेज व्हायरल केला जात आहे. पण हा मेसेज चुकीचा आणि दिशाभूल करणारा आहे.  या व्हेरिएंटमध्ये ताप आणि खोकल्यासारखी लक्षणं नाहीएत. डोकेदुखी पाटदुखी, निमोनिया यासारखी लक्षणं XXB व्हेरिएंटची आहेत. 

चीनमध्ये कोरोनाचं थैमान
चीनमध्ये कोरोनानं अक्षरश: थैमान घातलंय. 2019 पेक्षाही कोरोनाची ही लाट अत्यंत घातक असल्याचं सांगण्यात येतंय. कोरोनाच्या नव्या व्हेरियंटवर नियंत्रण मिळवण्यात चीन पूर्णपणे अपयशी ठरलाय. अशातच एका रिपोर्टमुळे चीनच्या पायाखालची वाळूच सरकलीय. या रिपोर्टनुसार चीनमध्ये दररोज तब्बल 10 लाख लोकांना कोरोनाची लागण होतेय. कहर म्हणजे अवघ्या 24 तासात 5 हजार लोकांचा मृत्यू झालाय. लंडनमधल्या ऍनाटिक्सी फर्म एअरफिनिटी लिमिटेडच्या हवाल्यानं ब्लूमबर्गनं हा रिपोर्ट दिलाय. चीननं झीरो कोव्हिड धोरण मागे घेताच रूग्णांची संख्या वाढू लागलीय.